India vs Netherland Hockey : भारत उपांत्य फेरीत | पुढारी

India vs Netherland Hockey : भारत उपांत्य फेरीत

क्वालालंपूर, वृत्तसंस्था : भारताच्या युवा हॉकी संघाने मंगळवारी ज्युनिअर वर्ल्डकप स्पर्धेत (India vs Netherland) अविस्मरणीय विजयाची नोंद केली. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतासमोर तगड्या नेदरलँडचे आव्हान होते आणि पहिल्या हाफमध्ये भारतीय संघ 0-2 असा पिछाडीवर पडला होता. इथून भारत पुनरागमन करणे अवघडच होते; परंतु या यंग ब्रिगेडने तो करिष्मा करून दाखवला. 57 व्या मिनिटाला उत्तम सिंगने गोल करून भारताला 4-3 असा विजय मिळवून देताना उपांत्य फेरीत प्रवेश पक्का करून दिला.

टीमो बोएर्स (5 मि.) व पेपिंज व्हॅन डेर हेडेन (16 मि.) यांनी भारतीय बचावफळी भेदून नेदरलँडला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पहिल्या हाफमध्ये डच संघाने ती कायम राखली; पण दुसर्‍या हाफमध्ये भारतीयांकडून आक्रमक खेळ झाला. आदित्य अर्जुन ललागेने 34 व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला अराईजितसिंग हुडालने गोल करून भारताला 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली. नेदरलँडकडून ऑलिव्हर हॉर्टेनसूसने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून नेदरलँडला पुन्हा आघाडी मिळवून दिली.

चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमणाची धार अधिक तीव्र केली आणि 52 व्या मिनिटाला सौरभ खुश्वालाने बरोबरी मिळवून दिली. सामना आता पेनल्टी शूटआऊटमध्ये जातो असे वाटत असताना उत्तम सिंगने 57 व्या मिनिटाला गोल करून भारताचा 4-3 असा विजय पक्का केला. भारताचा बचावपटू रोहितने अखेरच्या क्वार्टरमध्ये सहा पेनल्टी कॉर्नर वाचवून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविले गेले. (India vs Netherland)

हेही वाचा…

Back to top button