U-19 Asia Cup : टीम इंडियाने नेपाळला चिरडले, 10 विकेट राखून सर्वात मोठा विजय | पुढारी

U-19 Asia Cup : टीम इंडियाने नेपाळला चिरडले, 10 विकेट राखून सर्वात मोठा विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : U-19 Asia Cup : राज लिंबानीची (13 धावांत 7 विकेट) घातक गोलंदाजी आणि त्यानंतर अर्शीन कुलकर्णीच्या 43 धावांच्या जोरावर भारताने अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत नेपाळचा धुव्वा उडवत 10 गडी राखून दारुण पराभव केला. या विजयासह टीम इंडियाच्या युवा सेनेने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

दुबईच्या आयसीसी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार उदय सहारणने टॉस जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळच्या संघाची अवस्था अतिशय वाईट झाली. 9 धावांवर त्यांनी पहिली विकेट गमावली. सलामीवीर दीपक बोहराला (1) लिंबानीने बाद केले. त्यानंतर सातव्या षटकात उत्तम मगरलाही लिंबानीने खाते उघडण्याची संधी दिली नाही आणि त्याला क्लिन बोल्ड करून तंबूत धाडले. नेपाळची ही पडझड अशीच चालू राहिली. (U-19 Asia Cup)

अशाप्रकारे भारताच्या भेदक मा-यापुढे नेपाळचा संपूर्ण संघ 22.1 षटकात 52 धावांवर गारद झाला. यामध्ये सर्धाधिक 13 अतिरिक्त धावांचाही समावेश राहिला. नेपाळच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. हेमंत धामीने आठ तर, अर्जुन कुमल आणि डी बोहरा यांनी प्रत्येकी सात धावा केल्या. तर गुलसन झा, दीपेश कंडेल आणि आकाश चंद हे तीन खेळाडू केवळ चार धावा करून बाद झाले. दीपक डुमरे आणि मगर हे दोन फलंदाज शुन्यावर बाद झाले. तर कर्णधार देव खनाल आणि सुभाष भंडारी यांना प्रत्येकी दोन धावा करून माघारी परतावे लागले. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक सात फलंदाज बाद केले. या18 वर्षीय वेगवान गोलंदाजाने लक्ष्यवेधी गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने 9.1 षटके टाकली आणि फक्त 13 धावा खर्च करून सात विकेट घेतल्या. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 1.41 राहिला. याशिवाय आराध्या शुक्लाने दोन आणि अर्शीन कुलकर्णीने एक विकेट घेतली. (U-19 Asia Cup)

प्रत्युत्तरात, अर्शिन कुलकर्णीने (नाबाद 43) शानदार फलंदाजी करत भारतासाठी खेळी केली. त्याने सलामीवीर आदर्श सिंगसोबत 57 धावांची नाबाद भागीदारी केली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. आदर्शने 13 चेंडू आणि 2 चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या.

 

Back to top button