पुढारी ऑनलाईन डेस्क : Rahul Dravid : बीसीसीआयने एक दिवसापूर्वी कोच राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवल्याची घोषणा केली होती. म्हणजेच पुढील वर्षी होणार्या टी-20 वर्ल्ड कपपर्यंत राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहील; पण आता याप्रकरणी आता राहुल द्रविडचे स्पष्टीकरण आले आहे. राहुल द्रविडने अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नसल्याचे सांगितले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळ 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर संपुष्टात आला आहे. मात्र, भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी आणि कर्णधार रोहित शर्मासोबतचा समन्वय यामुळे द्रविडचा कार्यकाळ वाढण्याची अपेक्षा होती, बीसीसीआयनेही हे केले. भारतीय क्रिकेट बोर्डाने 29 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवल्याची घोषणा केली.
राहुल द्रविडला याबाबत विचारले असता तो म्हणाला, 'मी अद्याप बीसीसीआयसोबत करार केलेला नाही. मात्र, कार्यकाळ वाढविण्याबाबत चर्चा झाली आहे. कागदपत्रे मिळाल्यावर मी स्वाक्षरी करेन.'
राहुल द्रविड भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौर्यावर जाऊ शकतो, असे मानले जात आहे. या दौर्यासाठी भारतीय संघ याच आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.