Rahul Dravid | राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम, BCCI ने करार वाढवला | पुढारी

Rahul Dravid | राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम, BCCI ने करार वाढवला

पुढारी ऑनलाईन :  टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड याला कायम ठेवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफचा करार वाढवण्याची घोषणा केली. राहुल द्रविड २०२१ मध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक झाले होते. दोन वर्षे मुख्य प्रशिक्षपद सांभाळल्यानंतर आता त्याच्या कराराची मुदत संपली होती. आता त्यांच्या कराराची मुदत वाढवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

नुकत्याच संपलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ नंतर बीसीसीआयने द्रविडला करार वाढविण्याची ऑफर दिली होती. त्याबाबत BCCI ने राहुल द्रविडशी चर्चा केली आणि एकमताने करार पुढे वाढवण्यास सहमती दर्शविली.

प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करणारा भारतीय संघ कसोटी, एकदिवसीय आणि T20I क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. पण टीम इंडियाला कोणतीही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०२२ मधील T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. तसेच २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले होते.

“टीम इंडियासोबतची गेली दोन वर्षे अविस्मरणीय राहिली आहेत,” असे द्रविडने त्याच्या कराराच्या मुदतवाढीची घोषणा करताना सांगितले. “एकत्रितपणे आम्ही चढ-उतार पाहिलेले आहेत. या संपूर्ण प्रवासात संघाचा पाठिंबा आणि सौहार्द अभूतपूर्व आहे. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये जे आम्ही वातावरण तयार केले आहे त्याचा मला खरोखर अभिमान आहे. ही एक अशी संस्कृती आहे जी विजयाच्या अथवा प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूल राहते. आमच्या संघाकडे असलेली कौशल्ये आणि प्रतिभा अभूतपूर्व आहेत आणि आम्ही योग्य प्रक्रियेचे अनुसरण करणे आणि प्रयत्न करण्यावर भर दिला आहे. याचा एकूण भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.” असे द्रविडने म्हटले आहे.

“माझी कामगिरी आणि क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल मी बीसीसीआय आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी घरापासून दूर राहणे आवश्यक आहे आणि मी त्याबद्दल माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याचे मनापासून कौतुक करतो. पडद्यामागील महत्त्वाची भूमिका महत्त्वाची आहे. विश्वचषकानंतर आम्ही नवीन आव्हाने स्वीकारत असताना आम्ही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी वचनबद्ध आहोत.” असेही त्याने नमूद केले आहे.

Back to top button