IND vs AUS : गुवाहटीत ‘ऋतु’राज बहरला; पण मॅक्सवेलने चढवला विजयाचा वेल | पुढारी

IND vs AUS : गुवाहटीत ‘ऋतु’राज बहरला; पण मॅक्सवेलने चढवला विजयाचा वेल

गुवाहटी, वृत्तसंस्था : गुवाहटीच्या बारसपरा स्टेडियमवर धावांचा ऋतू बहरला. येथे झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तिसर्‍या टी-20 सामन्यात आधी भारताच्या ऋतुराजने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर भारताने 3 बाद 222 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण करून 5 विकेटस्नी विजय मिळवला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आव्हान जिवंत राखले आहे. भारत मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

सलामीवीर गायकवाडने 57 चेंडूत केलेल्या 123 धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात 3 बाद 222 धावा केल्या. ऋतुराजने पहिले शतक झळकावताना 13 चौकार आणि 7 षटकार ठोकले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक झळकावणारा ऋतुराज नववा भारतीय ठरला; पण मॅक्सवेलच्या शतकाने ऋतुराजची कामगिरी वाया गेली. सामनावीर ठरलेला मॅक्सवेल 104 धावांवर नाबाद राहिला.

भारताच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने सुरुवात दणक्यात केली; पण अर्शदीप सिंगने अ‍ॅरोन हार्डीला (16) बाद करून कांगारूंना पहिला धक्का दिला. पहिल्या षटकांत महागड्या ठरलेल्या आवेश खानने आपल्या दुसर्‍या षटकांत ट्रॅव्हिस हेडला (35) बाद केले. यानंतर रवी बिष्णोईने जोस इंग्लिशचा (10) त्रिफळा उडवला. 68 धावांत 3 विकेट गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला मॅक्सवेल आणि मार्कस स्टोईनिस यांनी सावरले. दोघांनी 35 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली.

अक्षर पटेलने मार्कस स्टोईनिसला (17) बाद करून भागीदारी संपुष्टात आणली. पाठोपाठ टीम डेव्हिडला बिष्णोईने शुन्यावर बाद केले. एका बाजूने विकेट पडत असल्या तरी ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का ग्लेन मॅक्सवेल मैदानावर उभा होता. त्याला साथ देण्यास कर्णधार मॅथ्यू वेड आला. दोघांनी फटकेबाजी करून टार्गेट जवळ आणले. अक्षर पटेलच्या 19 व्या षटकांत 22 धावा गेल्या, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या षटकांत 21 धावा करायच्या होत्या, तर मॅक्सवेल शतकापासून 14 धावा दूर होता; पण प्रसिद्ध कृष्णाने अतिशय गचाळ आणि दिशाहिन गोलंदाजी केली. त्याच्या पहिल्या चेंडूवर मॅथ्यू वेडने चौकार मारला, दुसर्‍या चेंडूवर एकेरी धाव घेतली. यानंतर स्ट्राईकवर आलेल्या मॅक्सवेलने षटकार, चौकार आणि पुन्हा चौकार ठोकून आधी शतक पूर्ण केले. पाच चेंडूत 19 धावा गेल्यामुळे शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज असताना मॅक्सवेलने स्ट्रेट चौकार ठोकून विजय साजरा केला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आज 6 धावांवर जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. इशान किशनला 5 चेंडू खेळवून झाय रिचर्डसनने भोपळ्यावर माघारी पाठवले. भारताला 24 धावांवर 2 धक्के बसले होते. कर्णधार सूर्यकुमार यादवने जोरदार फटकेबाजी करून टीम इंडियावरील दडपण हलके केले. ऋतुराज गायकवाड संयमी खेळ करून त्याला उत्तम साथ देताना दिसला आणि दोघांनी नवव्या षटकात अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. सूर्या व ऋतूने पहिल्या 10 षटकांत टीम इंडियाला 82 धावांपर्यंत नेले. (IND vs AUS)

11 व्या षटकात आरोन हार्डीने ही जोडी तोडली. सूर्यकुमार 29 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारासह 39 धावांवर झेलबाद झाला आणि ऋतुराजसह त्याची 57 (47 चेंडू) धावांची भागीदारी तुटली. तिलक वर्माला मोठी खेळी करण्याची संधी मिळाली आणि त्याने सुरुवात दणक्यात केली. ऋतुराजने 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने ट्वेंटी-20 कारकिर्दितील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आज केली. ऋतुराजने 18 व्या षटकात 6, 6, 4, 0, 6, 2 अशा 25 धावा चोपल्या. ऋतुराजने षटकाराने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 तील पहिले शतक पूर्ण केले. त्याने 52 चेंडूंत 11 चौकार व 5 षटकारांसह हा टप्पा पार केला. ग्लेन मॅक्सवेलने टाकलेल्या 20 व्या षटकात ऋतुराजने 30 धावा चोपल्या आणि भारताला 3 बाद 222 धावांपर्यंत पोहोचवले. ऋतुराज 57 चेंडूंत 13 चौकार व 7 षटकारांसह 123 धावांवर नाबाद राहिला. तिलकने 31 धावा करताना ऋतुराजसह 59 चेंडूंत 141 धावांची भागीदारी केली.

हेही वाचा…

Back to top button