दुष्काळी ४० तालुक्यांसाठी केंद्राकडून मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती | पुढारी

दुष्काळी ४० तालुक्यांसाठी केंद्राकडून मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

बारामती; पुढारी वृत्तसेवा : राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. बारामतीसह आजूबाजूच्या तालुक्यांचा त्यात समावेश आहे. या तालुक्यांसाठी केंद्राकडे निधीचा प्रस्ताव पाठवला आहे. तो मंजूर झाल्यावर भरीव मदत होईल. या व्यतिरिक्त अन्य तालुक्यात काही मंडलात दुष्काळसदृश स्थिती आहे. तेथे राज्य शासनाकडून मदत दिली जाणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, बारामती तालुक्यातही यंदा पाऊस झालेला नाही. परिणामी, तालुका निकषानुसार दुष्काळी तालुक्यांच्या यादीत गेला. या ४० तालुक्यांना दुष्काळ जाहीर झाल्यावर ज्या काही सवलती दिल्या जातात ते मिळतील. या व्यतिरिक्त जे तालुके यादीत आले नाहीत तेथेही परिस्थिती भीषण रूप घेत आहे. महसूलमंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री, ग्रामविकासमंत्री, जलसंपदामंत्री यांच्या समितीची बैठक घेऊन अनेक मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. तेथेही राज्य सरकारकडून सवलती दिल्या जातील.

दूध दराबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

दुधाचे दर कोसळले आहेत. दूध संघाचे पदाधिकारी भेटून गेले. यापूर्वी अशी स्थिती निर्माण झाली असताना अनुदान दिले गेले. आता दुष्काळी स्थितीत हिरवा चारा, खुराक, पशुखाद्य हा खर्च वाढला आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेत मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधितांची बैठक घेतली होती. परंतु, त्यातून मार्ग निघालेला नाही. आता मंगळवारी यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू, अशी माहिती पवार यांनी दिली.

जागावाटपावर बोलू इच्छित नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला असल्याचे सांगितले आहे, असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, यासंबंधी काहीही बोलू इच्छित नाही.

तेढ निर्माण करणारी वक्तव्ये नकोत

मराठा, ओबीसी आरक्षणावरून समाजात तेढ निर्माण होत असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, विकासाचे प्रश्न बाजूला पडले आहेत. रोज वेगवेगळे नेतेगण, प्रवक्ते, मान्यवर, राजकीय पदाधिकारी, सत्ताधारी, विरोधक बोलत आहेत. समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी, असे वक्तव्य कोणीही करू नये. प्रत्येकाने आपापली भूमिका मांडावी. आपल्या मागण्या सरकारकडे मांडाव्यात. सरकार त्यात लक्ष घालेल.

ऊसदर आंदोलनाबाबत तोडगा

माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात ऊसदर आंदोलन उभे केले होते. परंतु, तेथील निर्णय झालेला आहे. काही अंशी तोडगा निघाला आहे. यासंबंधी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह तेथील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह साखर आयुक्तांशी चर्चा केली आहे.

Back to top button