IND vs AUS Cricket World Cup final | क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून मुंबई ते अहमदाबाद विशेष ट्रेन | पुढारी

IND vs AUS Cricket World Cup final | क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून मुंबई ते अहमदाबाद विशेष ट्रेन

पुढारी ऑनलाईन : क्रिकेटप्रेमींसाठी मध्य रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना (IND vs AUS Cricket World Cup final) पाहण्यासाठी मुंबई ते अहमदाबाद असा प्रवास करणाऱ्या चाहत्यांसाठी मध्य रेल्वेने क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेन (Cricket World Cup special train) चालवण्याची घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या 

उद्या रविवारी (१९ नोव्हेंबर रोजी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची सुमारे १,३०,००० प्रेक्षक क्षमता आहे. त्यात भारतीय संघ अंतिम फेरीत खेळणार असल्याने अनेक चाहते वेगवेगळ्या शहरांमधून अहमदाबादला मोठ्या संख्येने जाण्याची शक्यता आहे. यामुळे हॉटेलचे खोली भाडे आणि विमान प्रवासाचे भाडे महागले आहे.

वर्ल्ड कप स्पेशल ट्रेन्सबाबत मध्य रेल्वेने सांगितले की, “ट्रेन क्रमांक ०११५३ CSMT- अहमदाबाद स्पेशल एक्स्प्रेस १८ नोव्हेंबर (शनिवार) रोजी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (रविवारी) ०६.४० वाजता अहमदाबादला पोहोचेल.

“ट्रेन क्रमांक ०११५४ अहमदाबाद – सीएसएमटी स्पेशल एक्सप्रेस अहमदाबादहून २० नोव्हेंबर रोजी (रविवार/सोमवारच्या मध्यरात्री) ०१.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (सोमवारी) सीएसएमटीला १०.३५ वाजता पोहोचेल.”

प्रसिद्धीपत्रकात असेही म्हटले आहे की ट्रेन छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरू होईल आणि अहमदाबादला पोहोचण्यापूर्वी दादर, ठाणे, वसई रोड, सुरत आणि वडोदरा येथे थांबा घेईल. या ट्रेनमध्ये एक एसी-फर्स्ट क्लास, थ्री एसी-२ टायर आणि ११ एसी-३ टायर कोच असतील.

Back to top button