Mohammed Shami Struggle : मोहम्मद शमी.. गांगुलीने हेरलेला ‘हिरा’ भारताचा ‘हिरो’ कसा बनला? जाणून घ्या प्रवास | पुढारी

Mohammed Shami Struggle : मोहम्मद शमी.. गांगुलीने हेरलेला ‘हिरा’ भारताचा ‘हिरो’ कसा बनला? जाणून घ्या प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mohammed Shami Struggle : आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देशाचा हिरो बनला आहे. बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शमीने एकट्याने सात विकेट्स घेत भारताला नेत्रदीपक विजय मिळवून दिला. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर पोहचला आहे. त्याच्या या लक्षवेधी कामगिरीनंतर प्रत्येकजण शमीच्या आयुष्यातील संघर्ष आणि मेहनतीचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

शमी करायचा स्मशानभूमीत सराव (Mohammed Shami Struggle)

शमीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा मोठा वाटा आहे. ज्याचा उल्लेख खुद्द शमीने अनेकदा केला आहे. तो उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील सहसपूर अलीनगर गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील शेतकरी होते. त्याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. जेव्हा जेव्हा त्याला खेळण्याची संधी मिळायची तेव्हा तो गोलंदाजी करायचा. त्याच्या घराच्या मागे एक स्मशानभूमी आहे, जिथे तो अनेकदा सराव करत असे. त्याकाळात शमीकडे लेदर बॉल घेण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे तो टेनिस बॉलने सराव करण्यावर भर द्यायचा.

शमी बंगालमध्ये क्रिकेट खेळायला आला, अन्…

शमीने लेदर बॉलने गोलंदाजी करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे प्रशिक्षक बदर अहमद यांनी त्याला खूप साथ दिली. स्थानिक स्पर्धेत शमीच्या गोलंदाजीसमोर कोणताही फलंदाज टीकाव धरू शकायचा नाही. गती आणि स्विंगची प्रतिभा असूनही उत्तर प्रदेशच्या ज्युनियर राज्य संघात त्याची निवड झाली नाही. प्रशिक्षक बदर अहमद नाराज झाले. पण त्यांनी आपल्या शिष्याला एक मोलाचा सल्ला दिला, तो म्हणजे प. बंगाल गाठून तेथे क्लब क्रिकेट खेळण्याचा. (Mohammed Shami Struggle)

गांगुली प्रभावित

शमीने ‘आपका हुक्म सर आँखो पर’ म्हणत प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार कोलकाता गाठले. त्याला या निर्णयाचे फळ मिळाले. त्याच्या प्रयत्नांची कोलकातामध्ये प्रशंसा झाली आणि त्याने ज्युनियर रँकमध्ये एन्ट्री घेतली. त्याची कामगिरी पाहून बंगाल रणजी संघात त्याला घेण्याची चर्चा रंगली. शमीला प्रशिक्षण शिबिरात बोलावण्यात आले आणि बंगाल संघातील काही वरिष्ठ क्रिकेटपटूंना नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सांगितले. यावेळी नेटमध्ये फलंदाजीसाठी समोर होता तो भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली. या दिग्गज डावखु-या फलंदाजाला गोलंदाजी करण्याचे दडपण शमीवर होते. पण त्याने लक्षवेधी मारा करून गांगुलीलाही प्रभावित केले. (Mohammed Shami Struggle)

दादा शमीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला

गांगुलीची नजर नेहमीच प्रतिभावान खेळाडूंवर असते. नेटमध्ये तरुण शमीच्या वेगवान मा-याचा सामना केल्यानंतर, भारताच्या माजी कर्णधाराने ताबडतोब व्यवस्थापन संघाला शमीकडे विशेष लक्ष आणि त्याच्या खेळासाठी सर्वतोपरी पाठिंबा देण्याची सूचना केली. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि एमएस धोनी यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंना पुढे आणण्यात गांगुलीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे त्याने शमीचीही प्रतिभा हेरली. गांगुलीकडून मिळालेल्या पाठिंब्यानंतर शमीने आपल्या खेळात आणखी सुधारणा केली आणि तो बंगाल कॅम्पमध्ये नियमित झाला. हळूहळू त्याचे दादासोबत खास नाते निर्माण झाले. दादा शमीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि क्रिकेटपटू म्हणून त्याचे पालनपोषण केले.

‘गांगुलीमुळेच फिटनेसवर कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळाली’

शमीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘आम्ही विजय हजारे ट्रॉफी सामन्यात एकत्र खेळत होतो. मी त्या सामन्यात एक विकेट घेतली होती. काहीवेळाने ड्रिंक ब्रेक झाला. त्यादरम्यान मी काहीतरी खात-पीत होतो. तेंव्हा दादा (गांगुली) माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझे कान टोचले. तू फास्ट बॉलर आहेस ना? मग मला तुझे पोट असे का दिसते? असे म्हणून मला एक हिडन मॅसेज दिला. त्यानंतर मला फिटनेसवर कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळाली. त्या संवादानंतर मी फिटनेसला गांभीर्याने घेतले. मला दुखापतींशी थोडा संघर्ष करावा लागला आणि माझे वजन 93 किलोपर्यंत वाढले. त्यामुळे स्वतःला फिटनेस आणि आहाराविषयी शिक्षित केले आणि काही महिन्यांत सुमारे 20 किलो वजन कमी करण्यात मला यश आले. आता खेळताना मला दुखापत कमी होते.’

Back to top button