नांदेड : आंध्रप्रदेशातून आलेला 11 क्विंटल गांजा जप्त, मुंबईतील NCB पथकाची कारवाई | पुढारी

नांदेड : आंध्रप्रदेशातून आलेला 11 क्विंटल गांजा जप्त, मुंबईतील NCB पथकाची कारवाई

गडगा (नांदेड), पुढारी वृत्तसेवा : नांदेड गांजा : आंध्रप्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथून 11 क्‍विंटल गांजा घेऊन नांदेडमार्गे जळगावकडे वाहतूक करणार्‍या ट्रकला जिल्ह्यातील मांजरम येथे एनसीबीच्या पथकाने पकडले असून ट्रकसह 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा पकडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या गांजाची किंमत काळ्या बाजारात 11 कोटी रूपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.

मुंबई येथील नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकार्‍यांचे पथक या ट्रकच्या मागावर होते. पोलीस निरीक्षक सुधाकर शिंदे, अमोल मोरे, संजय गवळी, प्रमोद मोरे आणि कृष्णा पारमदरेकर यांचा पथकात समावेश होता. या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशाखापट्टणमहून 11 क्‍विंटल 27 किलो गांजा 43 पोत्यांमध्ये भरून एम.एच.26.एडी.2165 या नांदेड पासिंगच्या ट्रकमधून जळगावकडे जात असल्याचे कळाले. संघटित अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना शोधून काढण्यात हा विभाग माहीर आहे.

हा गांजाने भरलेला ट्रक देगलूर सीमेवरुन महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर या पथकाने त्यांचा पाठलाग सुरु केला. यापूर्वी तेलंगणा राज्यातूनच हे पथक या ट्रकवर नजर ठेवून होते; परंतु ते मार्ग बदलत जात असल्याने या पथकाला अडचण येत होती; परंतु देगलूरपासून हे पथक सतत त्यांच्या मागे होते. रस्त्यात काहीवेळा ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्यांच्या गाडीवर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. चालकाच्या दहशतीला न जुमानता या पथकाने पाठलाग सुरूच ठेवला. हा ट्रक नरसीला आल्यानंतर टोलनाका चुकविण्यासाठी तो गडग्याहून कहाळ्याकडे निघाला. गडगा-कहाळा रस्त्यावर असलेल्या मांजरम येथे या पथकाने पहाटे 4.30 वाजता ट्रक थांबविण्यात यश मिळविले आणि सर्वप्रथम चालकास ताब्यात घेतले.

जप्‍त करण्यात आलेल्या गांजाचे वजन 1 हजार 127 किलो झाले असून त्याची अंदाजित किंमत 11 कोटींपेक्षा अधिक असल्याचे शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी या ट्रकची पासिंग नांदेडची करुन घेण्यात आली होती. कोणाला शंका येऊ नये यासाठी असे करण्यात आले असावे, अशी शंका एनसीबीच्या अधिकार्‍यांना आहे. ट्रकचा चालकच हा मालक असून त्याला ताब्यात घेण्यात आले असले तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी वेगळेच असून त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्‍त केला. पुढील कारवाई एनसीबीच्या मुंबई कार्यालयातून केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने यावर प्रतिक्रिया दिली. क्रांती रेडकरने वृत्तसंस्था एएनआयच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत “ना रुकेंगे, ना थमेंगे”, अशी प्रतिक्रिया दिलीय.

Back to top button