Pakistan vs Afghanistan | रोज ८ किलो मटण खाताय, पण फिटनेस कुठे? पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर वसीम अक्रम भडकले | पुढारी

Pakistan vs Afghanistan | रोज ८ किलो मटण खाताय, पण फिटनेस कुठे? पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर वसीम अक्रम भडकले

पुढारी ऑनलाईन : चेन्नई येथे सोमवारी झालेल्या विश्वचषक २०२३ तील सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवून सनसनाटी ‍‍विजय मिळवला. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम (Former Pakistan captain Wasim Akram) याने बाबर आझम याच्या नेतृत्त्वाखालील संघावर जोरदार टीका केली आहे. त्याने म्हटले आहे की पाकिस्तानच्या खेळाडूंचा फिटनेस खालावला आहे. (Pakistan vs Afghanistan World Cup 2023)

संबंधित बातम्या 

विश्वचषकात पाकिस्तानला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे उपांत्य फेरीत पोहोचवण्याच्या त्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. ८ व्या सामन्यांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानकडून झालेला पाकिस्तानचा हा पहिला पराभव होता. हा पराभव पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना जिव्हारी लागला आहे.

बाबर आझम, अब्दुल्लाह शफीकचे अर्धशतक तसेच इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांच्या खेळीने चेन्नईच्या अवघड खेळपट्टीवर पाकिस्तानला ५० षटकांत २८२ धावांपर्यंत मजल मारता आली. पण हे अफगाणिस्तानने हे लक्ष्य पार करत पाकिस्तानचा ८ विकेट्सनी पराभव केला. विश्वचषकातील हा मोठी उलटफेर आहे. याआधी अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवले होते.

“हे लाजिरवाणे आहे. केवळ २ विकेट्स, २८०-२९० ही मोठी धावसंख्या आहे. खेळपट्टी ओली आहे का ओली नाही. क्षेत्ररक्षण … तुमच्या फिटनेसची पातळी पाहा. आम्ही यावर चर्चा करत आहोत की गेल्या २ वर्षांपासून फिटनेस चाचणी झाली नाही. जर मी काही खेळाडूंची नावे घेतली तर त्यांना ते आवडणार नाही. असे दिसते की ते दररोज ८ किलो मटण खातात,” अशी प्रतिक्रिया अक्रमने पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीवर ए स्पोर्ट्सशी बोलताना दिली.

माजी मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक यांनी घेतलेल्या फिटनेस चाचण्या पाकिस्तानच्या खेळाडूंना आवडत नव्हत्या. पण त्या चाचण्यांमुळे संघाला मूलभूत गोष्टी सुधारण्यास मदत झाली होती, असेही अक्रम म्हणाला. (Pakistan vs Afghanistan World Cup 2023)

“खेळाडूंच्या फिटनेस चाचण्या झाल्या पाहिजेत. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात, तुम्हाला त्याचा मोबदला दिला जातो. मी मिसबाह सोबत आहे. जेव्हा तो प्रशिक्षक होता तेव्हा त्याच्याकडे असे निकष होते. पण खेळाडू त्याचा तिरस्कार करत होते. पण, ते संघासाठी काम करत होते. क्षेत्ररक्षण पूर्णपणे फिटनेसवर अवलंबून असते आणि ते सध्या मैदानावर दिसून येते.

“आता आम्ही अशा टप्प्यावर आलो आहोत, जिथे आम्ही केवळ प्रार्थना करू. इतर संघ आता हरण्याची वाट पाहू. मगच आम्ही उपांत्य फेरी गाठू शकतो,” असे अक्रम पुढे म्हणाला.

पाकिस्तानला धक्का दिल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी एमए चिदंबरम स्टेडियमवर ऐतिहासिक विजयोत्सव साजरा केला. यावेळी चाहत्यांची मोठी गर्दी दिसून आली.

पाकिस्तानचा पुढील सामना शुक्रवारी चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होईल. तर अफगाणिस्तान सोमवारी श्रीलंकेशी भिडेल. हा सामना पुण्यात होणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button