पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानने यंदाच्या विश्वषकात मोठा इतिहास रचला आहे. इंग्लंडपाठोपाठ पाकिस्तानचा पराभव करत अफगाणिस्तानने मोठा उलटफेर केला आहे बंगळूरच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकने अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे अफगाण संघाने आपल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर पार केले आणि 8 विकेट्स राखून सामना खिशात घातला. दरम्यान अफगाणिस्तानच्या या विजयाचे श्रेय भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने भारतीय कोचला दिले आहे. सचिनने या सामन्यानंतर ट्वीट करत अफगाणिस्तानचे भारतीय प्रशिक्षक अजय जडेजा यांचे जाहिर कौतुक केले आहे. (PAK vs AFG Ajay Jadeja)
सचिन म्हणाला, या विश्वचषकात अफगाणिस्तानची कामगिरी अतिशय चांगली आहे. त्यांची फलंदाजीमधील शिस्त, त्यांनी दाखवलेला लढण्याचा स्वभाव आणि विकेट्स घेतल्यानंतर आक्रमकपणे धावणे. यातून त्यांची मेहनत दिसून येते. अजय जडेजाच्या प्रभावामुळे असे होऊ शकते. ? जबरदस्त बॉलिंग लाइनअपसह, इंग्लंड आणि पाकिस्तानसारख्या संघांवर त्यांचे विजय अफगाणिस्तानच्या नवीन संघाच्या उदयाचे संकेत आहेत. याची क्रिकेट जगताने दखल घेतली आहे. ? छान! (PAK vs AFG Ajay Jadeja)
या सामन्यात इब्राहिम झद्रान (87 धावा), रहमानउल्ला गुरबाज (65), रहमत शाह (नाबाद 77), हशमतुल्ला शाहिदी (नाबाद 48) हे अफगाणिस्तानच्या या रोमहर्षक विजयाचे हिरो ठरले. या विजयासह अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यापूर्वी दोघांमध्ये 7 सामने खेळले गेले होते आणि सर्व सामन्यांत पाकने बाजी मारली होती. (PAK vs AFG Ajay Jadeja)