

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hitman Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हिटमॅनच्या बॅटने आतापर्यंत या स्पर्धेत भरपूर धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध खळबळ माजवल्यानंतर रोहितने पाकिस्तानच्या गोलंदाजीचाही धुव्वा उडवला. बांगलादेशविरुद्धही भारतीय संघाला हिटमॅनकडून अशाच खेळीची अपेक्षा आहे. पुण्यात होणाऱ्या सामन्यात रोहितच्या निशाण्यावर ब्रायन लाराच्या मोठ्या विक्रमावर असेल.
वास्तविक, 50 षटकांच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्मा सध्या 7व्या क्रमांकावर आहे. हिटमॅनने आतापर्यंत खेळलेल्या 20 डावांमध्ये 66.38 च्या सरासरीने 1195 धावा केल्या आहेत. या काळात भारतीय कर्णधाराने सात शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहितला अनेक दिग्गज फलंदाजांना मागे टाकण्याची संधी आहे.
बांगलादेशविरुद्ध सात धावा केल्यानंतर तो शाकिब अल हसनला मागे टाकेल. तर 13 धावा केल्यानंतर एबी डिव्हिलियर्सला मागे टाकेल. त्यानंतर 31 धावा करण्यात रोहित यशस्वी झाल्यास तो ब्रायन लाराच्या पुढे जाईल. लाराच्या नावावर वनडे विश्वचषकात एकूण 1225 धावा आहेत. विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. मास्टरब्लास्टरने 45 सामन्यात 2278 धावा केल्या आहेत.
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माची बॅट आतापर्यंत जोरदार बरसली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला असला तरी त्यानंतर त्याने आपल्या बॅटने धमाकेदार कामगिरी केली आहे. हिटमॅनने अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावांची संस्मरणीय खेळी खेळली केली. तर पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारतीय कर्णधाराने 86 धावांची विजयी खेळी साकारली होती.