Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला कधी संधी मिळणार? संपूर्ण विश्वचषक बसून घालवणार?

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला कधी संधी मिळणार? संपूर्ण विश्वचषक बसून घालवणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav : आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने निवडलेल्या 15 भारतीय खेळाडूंपैकी, 13 खेळाडूंनी आतापर्यंत किमान एक-एक सामना खेळला आहे. पण दोन खेळाडू अद्याप बाहेर बसले आहेत, ते म्हणजे सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी. या दोघांना अजूनपर्यंत तरी एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. अशा स्थितीत या खेळाडूंना संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणार का? की संपूर्ण विश्वचषक केवळ संघासोबत भटकण्यातच घालवणार? असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. पुढचा सामना कमकुवत मानल्या जाणाऱ्या बांगलादेशविरुद्ध आहे, त्यामुळे या दोघांपैकी एकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाची आतापर्यंत चांगली कामगिरी

सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकून दमदार सुरुवात केली आहे. पहिली लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली. हा संघ पाचवेळचा विश्वविजेता आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर त्यांच्याविरुद्धचा सामना जिंकून स्पर्धेत विजयी सलामी देण्याचे आव्हान होते. अशा परिस्थितीत सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडणे गरजेचे होते. अपेक्षेप्रमाणे टीम इंडियाने कांगारूंना पराभूत केले. यानंतर दुसरा सामना अफगाणिस्तानशी झाला. येथे प्रयोग करण्याची संधी होती, परंतु हा देखील सुरुवातीचा सामना होता, त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने आधीच्या विजयी संघासोबत जाणे पसंत केले. संघात फक्त एक बदल केला. अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूरला आणण्यात आले. तिसर्‍या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध मोठा सामना होता. त्यातही एकच बदल झाला. डेंग्यूमधून बरा झालेला शुभमन गिल दाखल झाला आणि त्याच्या जागी घेण्यात आलेल्या इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर व्हावे लागले. म्हणजे एकूण 15 पैकी 13 खेळाडूंनी किमान एक सामना खेळला आहे.

Suryakumar Yadav ला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान कसे मिळणार?

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा मधल्या फळीतील फलंदाज आहे, पण समस्या अशी आहे की सध्या केएल राहुल, श्रेयस अय्यर चांगली फलंदाजी करत आहेत. अशा परिस्थितीत सूर्याला तिथे जागा नाही. पुढच्या सामन्यात भारतीय संघ बांगलादेशशी भिडणार आहे. हा हलकासा सामना असेल, पण अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवून ज्या प्रकारे खळबळ माजवली आहे ते पाहता कोणत्याही सामन्याला कमी लेखता येणार नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवला पुढच्या सामन्यातही संधी मिळण्याची शक्यता नाही.

शमी देखील कट्ट्यावरच

सूर्याप्रमाणे (Suryakumar Yadav) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला देखील अद्याप एकही एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. वास्तविक, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापनाच्या रणनीतीनुसार त्यांना आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आवश्यक आहे. म्हणजे शार्दुल ठाकूर आणि अश्विन यांच्यापैकी एक ना दुसरा खेळाडू नक्कीच खेळेल. प्लेइंग इलेव्हनचा भाग कोण असेल हे मुख्यत्वे खेळपट्टी पाहून ठरवले जाईल. अशा परिस्थितीत मोहम्मद शमीला स्थान मिळेल असे वाटत नाही. दुसरीकडे जसप्रीत बुमराह ज्या पद्धतीने प्रदर्शन करत आहे त्यामुसार त्याला सध्या विश्रांती देता येणार नाही. मोहम्मद सिराजही विकेट्स घेत आहे. अशा स्थितीत बांगलादेशविरुद्ध रोहित शर्मा कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news