

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताने १९ व्या आशियाई स्पर्धेत भारताने आपला दबदबा कायम ठेवला. 'स्क्वॉश'मध्ये भारताच्या दीपिका पल्लिकल, हरिंदरपाल संधू जोडीने सुवर्ण पदकाची कमाई केली. स्क्वॉश क्रीडा प्रकारात पुरूष संघाने सुवर्ण पदक पटकावल्यानंतर मिश्र दुहेरीतही भारताने सुवर्ण पदकाला गवसणी घालत नवा इतिहास रचला आहे. (Asian Games 2023 Squash)
चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ८३ पदके मिळवली आहेत. यापूर्वी भारताने 'स्क्वॉश'मध्ये पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि महिला संघाने कांस्यपदक जिंकले आहे. (Asian Games 2023 Squash)
'स्क्वॉश' मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात अंत्यत चुरशीच्या पहिल्या गेममध्ये भारतीय जाेडीने ११-१० अशी आघाडी घेत पहिल्या गेमवर कब्जा केला. दुसऱ्या गेमध्येही भारताने सुरवातीलाच ३ गुणांची निर्णायक आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये ५ गुणांची आघाडी घेत भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र यानंतर सलग पाच गुण घेत मलेशियाच्या जोडीने कमबॅक केले. अंत्यत रोमहर्षक दुसऱ्या गेममध्ये अंतिम क्षणाला दीपिका पल्लिकल, हरिंदरपाल संधू यांनी बाजी मारत दुसरा गेमही आपल्या नावावर करत 'स्क्वॉश' मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 'स्क्वॉश'मध्ये पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक तर महिला संघाने कांस्यपदक जिंकले आहे. यानंतर मिश्र दुहेरीतही सुवर्ण पदकावर माेहर उमटवत भारताने 'स्क्वॉश'मध्ये नवा इतिहास रचला आहे.