पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया क्रीडा स्पर्धेत आज (दि. 3) मंगळवारी भारताच्या धावपटूंनी मैदान गाजवले. पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत भारताच्या मोहम्मद अफसलने रौप्यपदक पटकावले. त्याने 1 मिनिट 48.43 सेकंदांची वेळ घेत शर्यत यशस्वीरित्य पूर्ण केली. शेवटच्या काही मीटरमध्ये सौदी अरेबियाच्या एसा अलीने त्याच्यावर आघाडी घेतली आणि त्याचे सुवर्णपदक हुकले. भारताचा कृष्ण कुमार पाचव्या स्थानावर राहिला. या पदकासह भारताची पदकसंख्या 65 पर्यंत पोहचली आहे.
धावपटू पारूल चौधरीने इतिहास रचला. तिने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. या ऐतिहासिक कामगिरीच्य जोरावर भारताच्या खात्यात 14 वे सुवर्णपदक जमा झाले असून एकूण पदकांची संख्या 64 पर्यंत पोहचली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.
दरम्यान, पारुल चौधरीचे हे सलग दुसरे पदक आहे. काल सोमवारी तिने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये मैदान गाजवले होते. तिने 9 मिनिटे 27.63 सेकंदांची वेळ घेत रौप्यपदक पटकावले होते तर याच स्पर्धेत भारताच्या प्रिती लांबाने (वेळ : 9 मिनिटे 43.32 सेकंद) कांस्यपदकावर आपले नाव कोरले होते.
भारतीय स्क्वॉशपटू दीपिका पलिकल (Dipika Palikal) आणि हरिंदर पाल सिंग संधू (Harindar Pal Singh Sandhu) यांच्यासह अनाहत सिंग-अभय सिंग या जोड्यांनी मंगळवारी शानदार विजय मिळवले. या विजयासह आशियाई क्रीडा स्पर्धेच्या स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या (Squash Mixed Doubles) सामन्यात या भारतीय जोड्यांनी सेमीफायनलमध्ये (Quarter Finals) प्रवेश केला.
भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत फिलिपिन्सच्या जेमिका अरिबाडो आणि अँड्र्यू गारिका यांचा 2 विरुद्ध 1 गेमने (7-11, 11-5, 11-4) पराभव केला. भारतीय जोडीला फिलीपाईन्सच्या जोडीने कडवी झुंज दिली आणि पहिला गेम जिंकला. पण दीपिका आणि हरिंदर यांनी शानदार पुनरागमन केले आणि पुढेचे दोन्ही गेम जिंकून सामना खिशात टाकला. याचबरोबर या जोडीने सेमीफायनल गाठली असून भारतासाठी पदक निश्चित केले आहे.
दरम्यान, अनाहत सिंग आणि अभय सिंग या आणखी एका भारतीय जोडीने स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या (Squash Mixed Doubles) सेमीफायनलमध्ये प्रवेश करून पदक निश्चित केले आहे. भारतीय जोडीने हाँगकाँगच्या त्झे विंग टाँग आणि मिंग हाँग तांग यांचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यातही भारताने वर्चस्व राखले. सलग दोन गेम (11-10 11-8) जिंकून प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात केली. हाँगकाँगने पहिल्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीयांनी कोणतीही चूक केली नाही.