T20 WC : न्यूझीलंड उपांत्य फेरीत, टीम इंडियाचे पॅकअप | पुढारी

T20 WC : न्यूझीलंड उपांत्य फेरीत, टीम इंडियाचे पॅकअप

दुबई : पुढारी ऑनलाईन

टी २० विश्वचषक स्पर्धेत आज गट बी मधील सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानला आठ विकेटने पराभव केला आहे. या विजयानंतर किवी संघ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. याच बरोबर टीम इंडियाला टी २० विश्वचषक स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे.

सुपर-१२ च्या ४० व्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडच्या विजयासह भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. या सामन्यात किवी संघाचा पराभव झाला असता, तर भारताला टॉप-४ मध्ये स्थान पक्के करता आले असते. पण तसे झाले नाही. न्यूझीलंडने केवळ सामना जिंकला नाही तर उपांत्य फेरीतही दिमाखदार प्रवेश केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ ढेपाळला. संघाला २० षटकांच्या खेळात ८ विकेट गमावून केवळ १२४ धावाच करता आल्या. नजीबुल्ला झद्रानने सर्वाधिक ७३ धावा केल्या. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने ३ बळी घेतले. १२५ धावांचे लक्ष्य किवी संघाने १८.१ षटकांच्या खेळात केवळ २ गडी गमावून सहज गाठले.

केन-कॉनवे जोडीने विजय मिळवून दिला..

लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघाची सुरुवात खास राहिली नाही आणि चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मुजीब उर रहमानने डॅरिल मिशेलला (१७) बाद केले. मार्टिन गुप्टिल (२८) याला बाद करून रशीद खानने न्यूझीलंडची दुसरी विकेट घेतली. मात्र, त्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि केन विल्यमसन यांनी जबाबदारीने फलंदाजी केली. अफगानिस्तानचे गोलंदाज या दोघांना बाद करण्यात सपशेल अपयशी ठरले. केन-कॉनवे जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूत ६८ धावांची विजयी भागिदारी केली. विल्यमसनने ४२ चेंडूत नाबाद ४० तर कॉनवेने ३२ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या.

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने दुसऱ्यांदा टी २० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. विल्यमसनने कर्णधार म्हणून टी २० च्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५०० धावा पूर्ण केल्या.

रशीद खानच्या ४०० विकेट्स

या सामन्यात मार्टिन गप्टिलची विकेट घेतल्यानंतर अफगाणिस्तानच्या राशिद खानने टी-२० फॉरमॅटमध्ये ४०० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. ही कामगिरी करणारा तो अफगाणिस्तानचा पहिला आणि जगातील चौथा गोलंदाज ठरला.

Back to top button