Gill may break Tendulkar’s Record : शुभमन गिलच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विश्वविक्रम! | पुढारी

Gill may break Tendulkar's Record : शुभमन गिलच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विश्वविक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Gill may break Tendulkar’s Record : भारताचा सलामीवीर शुभमन गिल यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वनडे फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस बरसत आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की यंदाच्या वर्षी गिल हा भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा 25 वर्षांपूर्वीचा जुना विश्वविक्रम मोडू शकतो. गिलने या वर्षी वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 19 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 70.37 च्या अविश्वसनीय सरासरीने 1126 धावा फटकावल्या आहेत. या काळात त्याने दुहेरी शतकासह 4 शतके झळकावली. जर गिलने यावर्षी वनडेमध्ये आणखी 768 धावा केल्या तर तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. सध्या या यादीत सचिन तेंडुलकरचे नाव गेल्या 25 वर्षांपासून अग्रस्थानी आहे.

सचिन तेंडुलकरने 1998 मध्ये 1894 धावांसह हा विश्वविक्रम केला होता. त्या वर्षी खेळल्या गेलेल्या 34 सामन्यांमध्ये मास्टर ब्लास्टरने 65.31 च्या सरासरीने धावा वसूल केल्या होत्या. मास्टरब्लास्टरने या कालावधीत 9 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली होती. याला सचिनच्या कारकिर्दीतील स्वप्न वर्ष असेही म्हटले जाते. (Gill may break Tendulkar’s Record)

विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांनीही सचिन तेंडुलकरचा हा विश्वविक्रम मोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण ते खूप मागे राहिले. रोहित शर्माने 2019 मध्ये सर्वाधिक 1490 धावा केल्या होत्या. त्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत त्याने 5 शतके झळकावली होती. तर विराट कोहलीने 2017 मध्ये सर्वाधिक 1460 धावा केल्या होत्या.

गिलला आता सचिनचा विक्रम मोडण्याचा दावेदार मानले जात आहे. या वर्षी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी दोन एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त, त्याला अगामी विश्वचषक स्पर्धेत किमान 9 सामने आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळेल. गिलकडे अजून 14 सामने बाकी आहेत आणि तो ज्या वेगाने फलंदाजी करतोय, ते पाहता तो सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडू शकतो असे म्हणता येईल. (Gill may break Tendulkar’s Record)

Back to top button