ICC ODI World Cup 2023 : वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानला धक्का! खेळाडूंना मिळाला नाही भारताचा व्हिसा | पुढारी

ICC ODI World Cup 2023 : वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानला धक्का! खेळाडूंना मिळाला नाही भारताचा व्हिसा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 5 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा भारतात सुरू होणार असून एकून 10 संघ राऊंड रॉबिन पद्धतीने एकमेकांशी झुंझणार आहेत. तथापि, पाकिस्तान वगळता इतर आठ संघांना भारतात येण्यास व्हिसा मिळाला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाला अद्याप भारत सरकारकडून व्हिसा मंजूर झालेला नाही. त्यामुळे पाक संघाचा दुबईला जाऊन शिबिर घेण्याचा प्लॅन रद्द करण्यात आला आहे. विश्वचषकापूर्वी पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.

आठवड्याभरापूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता (ICC ODI World Cup 2023)

ईएसपीएनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी संघ विश्वचषक स्पर्धेपूर्वी दुबईत सरावाला जाणार होता. तिथून पाकिस्तानी संघ हैदराबाद गाठणार होता. आधी यूएई आणि मग भारत अशी योजना पाकिस्ताननं आखली होती. पण अद्याप तरी भारताकडून पाकिस्तानी संघाला व्हिसा मिळालेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डनं आठवड्याभरापूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता. पण अद्याप तरी व्हिसा मंजूर झालेला नाही.

पाक संघ 27 सप्टेंबरला दुबईला रवाना होईल (ICC ODI World Cup 2023)

पाकिस्तान संघ 27 सप्टेंबरला दुबईला रवाना होईल आणि त्यानंतर तेथून भारतात येईल. व्हिसाला झालेल्या विलंबाबाबत पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाने संयमी भूमिका घेतली आहे. निर्धारित वेळेत व्हिसा मिळेल, अशी आशा पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. पाकिस्तान संघाला २९ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे न्यूझीलंडविरोधात सराव सामना खेळायचा आहे.

पाकिस्तानचा पहिला सामना 6 ऑक्टोबरला

पाकिस्तानला 6 ऑक्टोबरला मोहीम सुरू करायची आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ हैदराबादच्या मैदानावर पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा सामना करेल. त्याचबरोबर पाकिस्तानला 29 सप्टेंबरला हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे.

असा आहे विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ (ICC ODI World Cup 2023)

विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ 22 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. बाबर आझमकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर शादाब खान उपकर्णधार आहे. नसीम शाहला दुखापतीमुळे संघात स्थान मिळवता आलेले नाही. वेगवान गोलंदाज हसन अलीचे संघात पुनरागमन झाले आहे. (ICC ODI World Cup 2023)

29 सप्टेंबरपासून सराव सामने सुरू होणार

29 सप्टेंबरपासून सराव सामने सुरू होणार आहेत. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. 2011 नंतर पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची संधी भारताला आहे. 2011 मध्ये भारतामध्येच विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती.

संघातील खेळाडू :

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर.

रिझर्व्ह : मोहम्मद हारिस, अबरार अहमद, जमान खान

Back to top button