IND vs AUS ODI Series : सूर्याचा फॉर्म, अय्यरचा फिटनेस; विश्वचषकापूर्वी भारतासमोर अनेक प्रश्न | पुढारी

IND vs AUS ODI Series : सूर्याचा फॉर्म, अय्यरचा फिटनेस; विश्वचषकापूर्वी भारतासमोर अनेक प्रश्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS ODI Series : श्रेयस अय्यरला पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी ‘ड्रेस रिहर्सल’ मानल्या जाणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत आपला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. तर सूर्यकुमार यादवला वन-डेमध्ये आपले रेकॉर्ड सुधारावे लागेल. संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या हे पहिले दोन सामने खेळणार नाहीत. अशा स्थितीत प्रशिक्षक राहुल द्रविडकडे बेंच स्ट्रेंथ तपासण्याची सुवर्णसंधी आहे.

मुंबईचे दोन्ही फलंदाज सूर्यकुमार आणि श्रेयस त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धेचा भाग होण्यासाठी स्वतःच्या आव्हानांचा सामना करत आहेत. 28 वर्षीय अय्यरने गेल्या सहा महिन्यांत फारसे क्रिकेट खेळलेले नाही. त्याच्या पाठदुखीवर शस्त्रक्रियाही झाली आहे. अशातच अय्यरला आशिया चषक स्पर्धेदरम्यान, पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध खेळताना त्याच्या जुन्या दुखापतीने डोकेवर काढले. त्यामुळे त्याच्या फिटनेसवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (IND vs AUS ODI Series)

चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी सांगितले की, ‘अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे तिन्ही सामने खेळू शकतो, पण पुढील पाच दिवसांत होणाऱ्या या तीन सामन्यांमध्ये तो पूर्ण 100 षटके मैदानात तग धरून खेळू शकतो का हे पाहणे बाकी आहे. विश्वचषकात मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी टीम इंडियाला अय्यर सारख्या फलंदाजाची गरज आहे,’ असे स्पष्टीकरण दिले.

सूर्यकुमार टी-20 मध्ये नंबर वन बॅट्समन असला तरी तो वनडेमध्ये फ्लॉप ठरला आहे. आतापर्यंत 27 वनडे खेळलेल्या सूर्याची वनडेतील सरासरी 25 आहे जी खूपच निराशाजनक आहे. मात्र तरीही विश्वचषकाच्या प्राथमिक संघात सूर्याचा समावेश करण्यात आला असून आता त्याला निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवावा लागणार आहे. (IND vs AUS ODI Series)

फिरकीपटू अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे 37 वर्षीय रविचंद्रन अश्विनसाठी संघाचे दार उघडले आहे. अक्षर वेळेत सावरला नाही तर अश्विन कारकिर्दीतील तिसरा आणि शेवटचा विश्वचषक खेळू शकतो. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याच्याची स्पर्धा आता वॉशिंग्टन सुंदरशी रंगणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसोबत अश्विनची लढत रंजक ठरू शकते. त्यामुळे त्याचे पारडे जड आहे. (IND vs AUS ODI Series)

कुलदीप यादव आणि पंड्या यांच्या अनुपस्थितीत अश्विन आणि सुंदर या दोघांनाही आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी आहे. मात्र, अक्षर फिट झाल्यास संघ व्यवस्थापन त्याचीच निवड करण्याची दाट शक्यता आहे. रोहित खेळला नाही तर इशान किशन आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करू शकतात. कोहलीच्या जागी अय्यरला मैदानात उतरवले जाईल.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला कव्हर म्हणून ठेवण्यात आले असून दुसऱ्या सामन्यानंतर तो हँगझोऊला रवाना होणार आहे. भारताने आपल्या कोणत्याही वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिलेली नाही पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना तीनपैकी एका सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते.

दुसरीकडे, अलीकडेच दक्षिण आफ्रिकेकडून मालिका 2-3 अशी गमावली असली तरी, ऑस्ट्रेलियन संघ मोठा प्रतिस्पर्धी मानला जात आहे. त्यांनी मार्चमध्ये भारतात शेवटची एकदिवसीय मालिका जिंकली होती. विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ 8 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत.

ट्रॅव्हिस हेडला झालेल्या दुखापतीमुळे मार्नस लॅबुशेनला संधी मिळाली आहे ज्याचा तो फायदा घेऊ इच्छित आहे. मात्र, सपाट भारतीय खेळपट्ट्यांवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजी आक्रमणाचे खरे आव्हान असेल.

भारतीय संघ :
केएल राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया संघ :
पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, मार्कस स्टोईनिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट.

Back to top button