पुढारी ऑनलाईन डेस्क : odi world cup : वनडे विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत, मात्र ही मेगा टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. संघाचे वेगवान गोलंदाज एनरिच नोर्खिया आणि सिसांडा मगाला दुखापतींमुळे भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषकातून बाहेर पडले आहेत. द. आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी गुरुवारी ही माहिती दिली. नोर्खिया आणि मगालाच्या जागी 15 जणांच्या विश्वचषक संघात अँडिले फेहलुकवायो आणि लिझाद विल्यम्स यांचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना एनरिक नॉर्खियाला पाठीचा त्रास झाला. या सामन्यात तो 5 षटके टाकून ड्रेसिंग रूममध्ये परतला. विश्वचषकापूर्वी तो तंदुरुस्त होईल, असा विश्वास आफ्रिकन संघाला होता पण पाठीची गंभीर दुखापत असल्यामुळे तो वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, मगालाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान जखमी झाला होता. त्याने गुडघ्याला दुखापत झाल्याची तक्रार केली होती आणि खबरदारी म्हणून त्याला वर्ल्ड कप संघातून वगळण्यात आले आहे. मगालाने आतापर्यंत द. आफ्रिकेसाठी 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये त्याने 25.4 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याने करेल. त्याआधी, हा संघ 29 ऑक्टोबरला अफगाणिस्तान तर 2 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध सराव सामने खेळणार आहे.
टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, अँडिले फेहलुक्वायो, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डुसेन, लिझाद विल्यम्स