

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय फुटबॉल संघाला चीन विरूद्ध ५-१ अशा गोल फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. आजचा (दि.२१) बांगलादेशविरूद्धचा सामना गट सामना भारतीय फुटबॉल संघासाठी करा किंवा मरा स्थितीचा होता. या सामन्यात सामन्याच्या ८५ व्या मिनिटाला भारताचा कर्णधार सुनिल छेत्रीने पेनल्टी किकवर केलेल्या एकमेव गोलमुळे भारताने बांगलादेशवर १-० अशा गोल फरकाने विजय मिळवला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील अ गटातील हा सामना थरारक झाला. सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघानी आक्रमक खेळी करत गोल करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु फिनिशिंग अभावी दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये गोल करण्यात गोल करण्याची संधी मिळाली नाही.
सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाला ८५ व्या पेनल्टीद्वारे गोल करण्याची संधी मिळाली. या सुवर्ण संधीचा वेध घेण्यासाठी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री पेनल्टी मारण्यासाठी आला. त्याने कोणतीही चुक न करता बॉलला गोलजाळीची दिशा दाखवली. सामन्यातील या एकमेव गोलमुळे भारतीय संघाने बांगलादेशवर विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.
भारतीय संघाला स्पर्धेमध्ये अ गटात म्यानमार संघाशी सामना करावा लागणार आहे. भारताला चीनविरुद्धच्या सामन्यात १-५ असा पराभव स्वीकारावा लागला होता. स्पर्धेतील पुढील फेरीत धडक मारण्यासाठी भारतीय संघाला म्यानमारविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. (Asian Games)
हेही वाचा :