पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK in New York : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा थरार पुढील वर्षी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पाहायला मिळणार आहे. जून 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल अर्थात आयसीसीने हा सामना न्यूयॉर्क शहरापासून 30 मैल पूर्वेस असलेल्या 930 एकरच्या आयझेनहॉवर पार्कमध्ये आयोजित करण्याची योजना आखली आहे. या स्टेडियमची आसन क्षमता सुमारे 34 हजार आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये स्पर्धा ही नेहमीपेक्षा मोठी कारण या स्पर्धेत एकूण 20 संघ खेळताना दिसणार आहेत. दरम्यान, विश्वचषकातील बहुप्रतिक्षित अशा भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या हायव्होल्टेज सामन्याचे अधिकृत वेळापत्रक आणि ठिकाण कसे असेल याची उत्सुकता आतापासूनच चाहत्यांना लागली आहे. अशातच न्यूयॉर्क पासून 30 मैलांवर असलेल्या आयझेनहॉवर पार्कमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कढत होईल अशी माहिती समोर येत आहे. (IND vs PAK in New York)
2022 साली जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ टी-20 विश्वचषकात शेवटचे आमनेसामने आले होते. तेव्हा विराट कोहलीच्या बॅटमधून एक संस्मरणीय सामना जिंकवणारी खेळी पाहायला मिळाली होती. 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत 20 संघांना 4 गटात विभागले जाईल. एका गटात 5 संघ असतील. ज्यामध्ये टॉप-2 संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील. यानंतर, सुपर-8 मध्ये प्रत्येकी 4 संघांचे 2 गट असतील आणि अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करतील. (IND vs PAK in New York)
सध्या सर्वांचे लक्ष आगामी वनडे वर्ल्डकपकडे लागले आहे. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याची सर्व तिकिटे अवघ्या काही सेकंदात विकली गेली आहेत.
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत मेजर लीग टी-20 चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने चाहते सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते. अमेरिकेच्या भूमीवर क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आयसीसीने अनेक योजनाही आखल्या आहेत. हा देश जगातील सर्वात मोठा मीडिया मार्केट तसेच जगभरातील सर्वात वेगाने वाढणारी क्रिकेट बाजारपेठ ठरू शकतो हे आयसीसीने ओळखले आहे. आयसीसी इव्हेंटसाठी मीडिया अधिकारांच्या डॉलर मूल्याच्या बाबतीत यूएसए अव्वल 4 देशांमध्ये असल्याचे मानले जाते. टी-20 वल्डकपसाठी अमेरिकेला सह-यजमानपद देणे हा याच योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यामुळे अमेरिकेत क्रिकेटला चालना मिळेल यात शंका नाही.