IND vs PAK : पाकिस्तान चारी मुंड्या चित | पुढारी

IND vs PAK : पाकिस्तान चारी मुंड्या चित

कोलंबो, वृत्तसंस्था : वेगवान गोलंदाजीच्या जोरावर भाव मारणार्‍या पाकिस्तानचा (IND vs PAK) भारतीय फलंदाजांनी अक्षरश: कचरा करून टाकला. शाहिद आफ्रिदी, नसीम खान, हॅरिस रौफ, इफ्तिकार खान यांच्याबरोबरच शादाब खानची मनसोक्त धुलाई करीत भारताने पाकिस्तानवर 228 धावांनी विजय मिळवला. वन-डे क्रिकेटचा विचार करताना भारताचा हा पाकवरील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय आहे. पावसामुळे हा सामना दोन दिवस (16 तास) चालला. शतकवीर विराट कोहलीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

आशिया कप सुपर-4 मधील भारत-पाकिस्तान सामना राखीव दिवशी म्हणजे, सोमवारी खेळवण्यात आला. विराट कोहली (122), के. एल. राहुल (111) यांची शतके आणि रोहित शर्मा (56), शुभमन गिल (58) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 2 बाद 356 असा धावांचा हिमालय उभा केला. विराटचे हे 47 वे एकदिवसीय सामन्यातील शतक ठरले, तर 77 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. दुखापतीमुळे सहा महिने क्रिकेटपासून दूर असणार्‍या के. एल. राहुलनेही आपले शतकी पुनरागमन केले.

या धावांचा पाठलाग करणारा पाकिस्तानचा संघ भारतीय धावांच्या जवळपासही फिरकू शकला नाही. कुलदीप यादव (25 धावांत 5 विकेट) आणि इतर गोलंदाजांच्या भेदक मार्‍यापुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. बाबर आझम, फखर झमान, मोहम्मद रिझवान यांच्यासारखे नावाजलेले फलंदाज ढेपाळले. त्यांना 32 षटकांत 128 धावाच करता आल्या.

संबंधित बातम्या

प्रत्युत्तरादाखल खेळणार्‍या पाकिस्तानला जसप्रीत बुमराह व हार्दिक पंड्या यांनी सुरुवातीला धक्के दिले. इमाम-उल-हक (9) आणि बाबर आझम (10) माघारी परतल्यानंतर शार्दूल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात मोहम्मद रिझवानला (2) माघारी पाठवले. त्यानंतर कुलदीप यादवने कमाल केली आणि पाकिस्तानची अवस्था अधिक बिकट केली. त्याने फखर झमानचा (27) त्रिफळा उडवला, सलमान आगाला (23) पायचीत केला, शादाब खान (6) व इफ्तिखार अहमद (23) यांना झेलबाद केले. 30 षटकांत पाकिस्तानची अवस्था 7 बाद 119 अशी झाली होती, त्यांना 20 षटकांत 238 धावांची गरज होती. त्यात कुलदीपने पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला. फईम अश्रफचा (4) त्रिफळा त्याने उडवला अन् 8 बाद 128 धावांवर पाकिस्तानने हार मानली. हॅरीस रौफ व नसीम शाह जखमी असल्याने फलंदाजीला आले नाहीत आणि भारताने 228 धावांनी मॅच जिंकली.

तत्पूर्वी, भारताने आपला डाव 2 बाद 147 धावांपासून पुढे सुरू केला. रविवारची नाबाद जोडी विराट कोहली आणि के. एल. राहुल यांनी शतकी खेळी करत तिसर्‍या विकेटसाठी नाबाद द्विशतकी (233) भागीदारी रचली. या दोघांनी भारताच्या 50 षटकांत 2 बाद 356 धावा झाल्या. विराट कोहलीने 94 चेंडूंत नाबाद 122 धावा ठोकल्या, तर के. एल. राहुलने 106 चेंडूंत नाबाद 111 धावा केल्या. (IND vs PAK)

विराट कोहली आणि के. एल. राहुलयांनी पाकिस्तानी गोलंदाजांना रडकुंडीला आणले. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणार्‍या के. एल. राहुलने संधीचे सोने करीत खणखणीत शतक झळकावले. पाठोपाठ विराटनेही शतकी खेळी करून पाकिस्तानची हालत खराब केली. विराट, के. एल. राहुलने आशिया चषक स्पर्धेतील भारतासाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम नोंदवला.

रविवारी रोहित (56) आणि शुभमन (58) यांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची विक्रमी भागीदारी केली. पावसामुळे 24.1 षटकांनंतर 2 बाद 147 धावांवर भारताचा खेळ थांबवावा लागला होता. सोमवारी 4.40 वाजता मॅच सुरू झाली आणि विराट व राहुल यांनी तुफान फटकेबाजी केली. ओल्या खेळपट्टीवर सुरुवातीला या दोघांनी संयमी खेळ केला अन् नंतर हात मोकळे केले. हॅरीस रौफ दुखापतीमुळे सोमवारी गोलंदाजी करणार नसल्याने पाकिस्तानची बाजू कमकुवत झाली. उत्तुंग फटक्यांसोबतच विराट-के. एल. राहुल 2-2 धावाही चतुराईने चोरत होते. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाज हतबल झाले.

हॅरीसच्या गैरहजेरीमुळे इफ्तिखारने 5 षटके टाकली अन् भारताने 46 धावा कुटल्या. सेट झालेल्या या दोघांनी अखेरच्या षटकांत स्टेडियम चौकार-षटकारांनी दणाणून सोडले. के. एल. राहुलने 100 चेंडूंत 10 चौकार व 2 षटकारांसह शतक पूर्ण केले. विराटनेही 84 चेंडूंत वन-डे तील 47 वे शतक झळकावले, यासह त्याने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 13,000 धावांचा वर्ल्ड रेकॉर्डही नावावर केला.
सचिन तेंडुलकरच्या नावावर हा विक्रम होता. विराट व के. एल. राहुल यांनी 233 धावांची भागीदारी केली आणि भारताला 50 षटकांत 356 धावांपर्यंत पोहोचवले. विराट 94 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकारांसह 122 धावांवर, तर के. एल. राहुल 106 चेंडूंत 12 चौकार व 2 षटकारांसह 111 धावांवर नाबाद राहिले.

भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी (IND vs PAK)

भारतीय संघाने वन-डे क्रिकेटमधील पाकिस्तानविरुद्ध (धावांनी) सर्वात मोठा विजय सोमवारी मिळवला. विजयासाठी ठेवलेल्या 357 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला 128 धावा करता आल्या अन् भारताने 228 धावांनी विजय मिळवला. यापूर्वी 2008 मध्ये मिरपूर येथे 140 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात कुलदीप यादवने पाच विकेटस् घेतल्या आणि आशिया चषकात 5 विकेटस् घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अर्शद आयूब (वि. पाकिस्तान, 1988) यांनी हा पराक्रम केला होता. सोमवारच्या विजयासह भारताने सुपर-4 पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आणि पाकिस्तानची घसरण झाली.

भारताने 228 धावांनी विजय मिळवून सुपर-4 गटात अव्वल स्थानी झेप घेतली आणि 4.560 असा भारताचा नेट रन रेट आहे. आता त्यांना श्रीलंका आज (मंगळवारी) आणि शुक्रवारचा बांगला देशविरुद्धचा सामना जिंकून फायनल सहज गाठता येईल. श्रीलंका 0.42 नेट रन रेटसह दुसर्‍या स्थानावर आहे आणि त्यांना भारत व पाकिस्तान यांचा सामना करायचा आहे. पाकिस्तानचा एकच सामना शिल्लक आहे आणि त्यांना तो कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.

हेही वाचा…

Back to top button