न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : नोव्हाक जोकोव्हिचने 'यूएस ओपन 2023' (US Open 2023) चे विजेतेपद पटकावले आहे. जोकोव्हिचने न्यूयॉर्कमधील मार्गारेट कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावले. चुरशीच्या लढतीत सर्बियाच्या 36 वर्षीय अनुभवी खेळाडूने 6-3, 7-6 (7-5), 6-3 असा विजय मिळवला. या विजयासह नोव्हाक जोकोव्हिचने चौथ्यांदा अमेरिक ओपन स्पर्धा जिंकली असून, त्याचे हे कारकिर्दीतील तब्बल 24 वे ग्रँडस्लॅम ठरले.
तब्बल 1 तास 44 मिनिटे चालला दुसरा सेट
तीन सेटमध्ये नोव्हाक जोकोव्हिचने डॅनिल मेदवेदेव याचा पराभव केला. मात्र, या दोघांमध्ये झालेले तिन्ही सेट टेनिस प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. नोव्हाकने त्याच्या चाहत्यांना अजिबात निराश न करता आपण जगज्जेतेपदासाठी का दावेदार आहोत? याचा नमुनाच अवघ्या जगासमोर सादर केला. पहिल्या सेटमध्ये नोव्हाकने 6-3 असा सहज विजय मिळवत आपला क्लास दाखवून दिला; पण मेदवेदेवसाठी खरी परीक्षा दुसरा सेट ठरली.
दुसर्या सेटमध्ये मेदवेदेवने कडवी झुंज देत, त्यानेही यूएस ओपनच्या अंतिम फेरीला साजेसा खेळ केला; पण नोव्हाकच्या अव्वल दर्जाच्या फटक्यांसमोर मेदवेदेवला अखेर शरणागती पत्करावी लागली. हा सेट टायब्रेकरमध्ये गेल्यानंतर नोव्हाकने आपला खेळ अजून उंचावत सेट खिशात घातला. 7-6(5) असा हा सेट जिंकून जोकोव्हिचने आघाडी घेतली. दुसर्या सेटमध्ये दमछाक झालेल्या मेदवेदेवला तिसर्या सेटमध्ये नोव्हाकने 6-3 असे सहज हरवत चौथ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले.
जोकोव्हिचचा आलिशान व्हिला (US Open 2023)
टेनिस आणि ब्रँड असोसिएशन व्यतिरिक्त, नोव्हाक जोकोव्हिचला रिअल इस्टेटमध्ये खूप रस आहे. माँटे कार्लोमध्ये एक आलिशान व्हिला आणि न्यूयॉर्क शहरात त्याचे एक लक्झरी अपार्टमेंटदेखील आहे. याशिवाय तो एक व्यावसायिकही आहे. जोकोव्हिचकडे त्याच्या कपड्यांसह स्वतःचे रेस्टॉरंटदेखील आहे. हे सर्व एकत्र पाहता नोव्हाक जोकोव्हिचची 2023 मध्ये एकूण संपत्ती 240 दशलक्ष डॉलर (19.9 अब्ज) असण्याचा अंदाज आहे. 2022 मध्ये त्याची एकूण संपत्ती 220 दशलक्ष डॉलर होती.
अब्जावधी संपत्तीचा मालक जोकोव्हिच
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने 'यूएस ओपन'च्या अंतिम फेरीत आश्चर्यकारक कामगिरी केली. रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत त्याने आणखी एक विजेतेपद पटकावले. प्रत्येक वर्षी त्याच्या ट्रॉफीच्या आकड्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे; पण त्याच वेळी जोकोव्हिचच्या संपत्तीतही सातत्याने वाढ होत आहे.
स्पर्धेतील बक्षिसांमधून सर्वाधिक रक्कम
36 वर्षीय नोव्हाक जोकोव्हिचने स्पर्धेतील बक्षिसांमधून भरपूर पैसे कमावले आहेत. त्याने स्पर्धेच्या बक्षिसांमधून 169 दशलक्ष डॉलर (14,00,04,67,000 भारतीय रुपये) कमावले आहेत. स्पर्धेतील पारितोषिकांमधून सर्वाधिक कमाई करणारा पुरुष टेनिसपटू म्हणून त्याची ख्याती आहे.
जाहिरातीतूनही बक्कळ कमाई
नोव्हाक जोकोव्हिच मोठ्या ब्रँडशी जोडलेला आहे. तो त्यांच्याशी कोलॅब्रेशन करतो आणि त्यांच्या जाहिराती करतो. याने जोकोव्हिचची संपत्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जॉको लॅकोस्टे, हेड आणि एसिक्स सारख्या मोठ्या कंपन्यांशी तो जोडलेला आहे. अशा सहकार्यातून हा टेनिसस्टार भरपूर पैसे कमावतो.
मी याची कधीच कल्पना केली नव्हती!
विजयानंतर जोकोव्हिचने भावनिक प्रतिक्रिया दिली. मी कधीच कल्पना केली नव्हती की, कधीतरी मी अशाप्रकारे तुमच्यासमोर उभा राहून माझ्या 24 व्या 'ग्रँडस्लॅम'विषयी बोलेन. हे कधी प्रत्यक्षात उतरेल याचा मी कधीच विचार केला नव्हता; पण गेल्या दोन वर्षांत मला असे वाटू लागले होते की, मी हे करू शकतो. मला संधी आहे. मला इतिहास घडवण्याची संधी असेल, तर मी ती का घेऊ नये? अशी प्रतिक्रिया 36 वर्षीय जोकोव्हिचने दिली.