

वेस्ट इंडिज संघाचा स्टार आणि अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो याने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. सध्या युएई मध्ये टी२० वर्ल्ड कप खेळला जात आहे. या वर्ल्ड कप नंतर आपण निवृत्ती घेत असल्याची ड्वेन ब्रावोने घोषणा केली आहे.
टी२० वर्ल्ड कपमध्ये सुपर १२ संघामध्ये साखळी सामने खेळवले जात आहेत. वेस्ट इंडिजचा समावेश ग्रुप २ मध्ये आहे. दरम्यान गुरुवारी श्रीलंकेकडून हार पत्करल्यानंतर वेस्ट इंडिजचे सेमी फायनल पर्यंत पोहचण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता या साखळी सामन्यात वेस्ट इंडिज त्यांचा शेवटचा सामना खेळणार आहे. या सामन्यानतंर ड्वेन ब्रावो हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेणार आहे.
ड्वेन ब्रावो हा वेस्ट इंडिज संघातील अत्यंत प्रभावी खेळाडू आहे. त्याने स्वत:च्या बळावर वेस्ट इंडिज संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. वेस्ट इंडिजने २ वेळा टी २० वर्ल्ड कप पटकावला आहे. या विजयात त्याचा बहुमोल वाट होता. ड्वेन ब्रावो याने या आधीही आंतरराट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. पण, ३८ वर्षांच्या ड्वेन ब्रावो याने २०१९ साली पुन्हा पुनरागमन केले होते. सध्याच्या वेस्ट इंडिज संघातील तो एक प्रमुख खेळाडू आहे. यंदा सुद्धा त्याने आपला बहुमोल वाटा संघासाठी दिला. पण, वेस्ट इंडिज संघाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.
निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ड्वेन ब्रावो म्हणाला, 'आता वेळ आली आहे की मी महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा. गेल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या काळात अनेक चढ उताराचे प्रसंग आले, पण मी कधीही मागे वळून पाहिलं नाही. इतक्या दीर्घ काळ क्रिकेट जगतात आणि कॅरेबियन जनतेचे प्रतिनिधीत्व करता आले त्यामुळे मी सर्वांचा खूप आभारी आहे.'
ब्रावो याने आता पर्यंतच्या सर्व ७ टी २० वर्ल्ड कपमध्ये सहभाग नोंदवला आहे. २०१६ मध्ये वेस्ट इंडिज विजेता संघ ठरला आहे. यासह त्याने आपल्या संघासाठी ९० टी२० सामने खेळले असून यामध्ये त्याने १२४५ धावा केल्या आहेत तर ७८ बळी घेतले आहेत. सन २००४ मध्ये ब्रावो याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीस सुरुवात केली होते. त्याने ४० कसोटी सामन्यात २२०० धावा केल्या तर ८६ बळी घेतले. तसेच १६४ एकदिवसीय सामन्यात १९९ बळी घेत २९६८ धावा केल्या आहेत.