India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे ढग | पुढारी

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे ढग

कँडी; वृत्तसंस्था : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्‍या सामन्यावर पावसाचे ढग दाटले आहेत. या हाय व्होल्टेज सामन्यावेळीत श्रीलंकेतील कँडीला ‘बालागोल्ला’ वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांची तिकिटे काही मिनिटांतच विकली जातात. हा सामनादेखील त्याला अपवाद नाही. मात्र, पावसामुळे चाहत्यांची घोर निराशा होण्याची शक्यता आहे.

या सामन्यात पावसाची शक्यता ही 91 टक्के आहे. पाऊस साधारणपणे संध्याकाळी 5.30 ला सुरू होईल. या परिसरात जवळपास 75 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने देशाच्या अनेक भागांत काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. कँडी हे केंद्रीय प्रांतात येते. इथे शुक्रवारी आणि शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने बुधवारच्या आपल्या बुलेटीनमध्ये सांगितले की, ‘पश्चिम, सबरागमुवा, केंद्रीय आणि उत्तरी प्रांतात तसेच गाले आणि मतारा जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. हा पाऊस जोरदार असण्याची शक्यता आहे. पश्चिम सबरागमुवा प्रांत आणि गाले आणि मतारा जिल्ह्यांत जवळपास 75 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.’

पीच रिपोर्ट : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी नवी खेळपट्टी वापरली जाईल. त्यामुळे तिचे स्वरूप कसे असेल, हे आताच सांगणे कठीण आहे. बांगला देश- श्रीलंका सामन्याप्रमाणे जर खेळपट्टी असेल, तर वेगवान आणि फिरकी गोलंदाज सुखावतील, अशा परिस्थितीत फलंदाजांची चांगलीच कसोटी लागेल. येथे पावसाचा अंदाज वर्तवला असल्यामुळे त्याचाही खेळपट्टीवर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा : 

 

Back to top button