Asia Cup : पाकिस्तानविरुद्ध रोहित, विराटची बॅट नेहमीच तळपली | पुढारी

Asia Cup : पाकिस्तानविरुद्ध रोहित, विराटची बॅट नेहमीच तळपली

‘आशिया कप’ (Asia Cup) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज होणार आहे. 2019 नंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरतील. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि रन मशिन विराट कोहली कसे प्रदर्शन करतील, याची उत्सुकता लागून राहिली आहे. पाकिस्तानविरुद्ध या दोघांनी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे.

कर्णधार रोहितने पाकिस्तानविरुद्ध 16 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. या 16 वन-डेमध्ये 51.42 च्या सरासरीने 720 आणि 11 टी-20 मध्ये 118.75 च्या स्ट्राईक रेटने 114 धावा केल्या आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या 15 (वन-डे आणि टी-20) सामन्यांमध्ये भारतीय कर्णधाराने 561 धावा केल्या आहेत. यात रोहितने दोन शतके आणि तीन अर्धशतके ठोकली आहेत.

वन-डे आशिया चषक स्पर्धेत रोहितने सात सामन्यांच्या सात डावांमध्ये 73.40 च्या सरासरीने 367 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.

विराटने कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 13 वन-डे आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. या 13 वन-डे सामन्यांत 48.72 च्या सरासरीने 536 आणि 10 टी-20 मध्ये 123.85 च्या स्ट्राईक रेटने 488 धावा केल्या आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या 15 (वन-डे आणि टी-20) सामन्यांमध्ये कोहलीने 13 डावांत 671 धावा केल्या आहेत. यात कोहलीने एक शतक आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत.

एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेतील सामन्यांतही विराट कोहलीने तीन सामन्यांच्या तीन डावांत 68.66 च्या सरासरीने 206 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे.

रोहित 10 हजार धावांच्या जवळ (Asia Cup)

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार रोहित शर्माला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. तो या फॉरमॅटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. सर्वात कमी डावांमध्ये 10 हजार धावा करणारा तो दुसरा क्रिकेटर बनू शकतो. रोहितकडे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

भारतीय कर्णधाराला एकदिवसीय 10,000 धावा पूर्ण करण्यासाठी 163 धावांची गरज आहे. तो हा टप्पा ‘आशिया कप’दरम्यान सहज करू शकतो. यात त्याला यश आलेच, तर तो सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजांच्या पुढे जाईल.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 205 डावांमध्ये 10,000 धावा करण्याचा विश्वविक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, तर सचिन तेंडुलकर दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने 259 डावांत हा पराक्रम केला. त्याचवेळी सौरव गांगुलीने 263 डावांमध्ये आणि रिकी पाँटिंगने 266 डावांमध्ये हा पराक्रम केला, तर जॅक कॅलिसने 272 आणि एम. एस. धोनीने 272 डावांमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

Back to top button