IND vs WI T20 : टीम इंडिया पूर्ण करणार अनोखे द्विशतक! टी-20 सामन्यात उतरताच… | पुढारी

IND vs WI T20 : टीम इंडिया पूर्ण करणार अनोखे द्विशतक! टी-20 सामन्यात उतरताच...

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs WI T20 : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात गुरुवारपासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला (T20 Series) सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. याआधी या मैदानावर झालेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने (Team India) यजमान संघावर 200 धावांनी विजय मिळवून ती मालिका 2-1 ने जिंकली. आता याच मैदानावर टीम इंडिया पुन्हा टी-20 सामना खेळण्यासाठी उतरणार असून इतिहास रचणार आहे. हा भारतीय संघाचा 200 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना (Team India T20 200th Match) असेल. भारतापूर्वी जगात एकच संघ असा आहे ज्याने 200 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. म्हणजेच टीम इंडिया हा टप्पा गाठणारा जगातील दुसरा संघ बनेल.

भारत पहिला टी-20 सामना कधी खेळला? (IND vs WI T20)

भारतीय संघाने (Team India) पहिला टी-20 सामना 1 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. वीरेंद्र सेहवागने त्या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आणि भारताने तो सामना 6 विकेटने जिंकला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा एकमेव टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानंतर वर्षभरातच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यावहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरले. आता तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडिया हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली 200 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. (IND vs WI T20)

सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे टॉप 10 संघ

पाकिस्तान : 223
भारत : 199 (विंडिजविरुद्ध 200वा सामना खेळणार आहे)
न्यूझीलंड : 193
श्रीलंका : 179
वेस्टइंडीज : 178 (भारता विरुद्ध 179 वा सामना खेळणार आहे)
ऑस्ट्रेलिया : 174
इंग्लंड : 173
द. आफ्रिका : 168
बांगलादेश : 152
आयर्लंड : 152

टीम इंडियाचे रेकॉर्ड

17 वर्षात भारताने टी-20 फॉरमॅटमध्ये (T20 Team India) अनेक चढ-उतार पाहिले आहेत. जिथे टीम इंडियाने पहिल्या वर्षीच वर्ल्ड चॅम्पियन बनून या फॉरमॅटची धमाकेदार सुरुवात केली. आतापर्यंत भारतीय संघाने 199 पैकी 127 सामने जिंकले आहेत तर 63 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. जिंकलेल्या सामन्यांपैकी असे तीन सामने आहेत जे टाय झाल्यानंतर टीम इंडियाने बॉल आऊट किंवा सुपर ओव्हरमध्ये त्यात विजय मिळवला आहे. याशिवाय एक सामना बरोबरीत सुटला असून 5 सामने अनिर्णित राहिले आहेत. या 17 वर्षांत भारतीय संघाने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक पटकावला तर 2014 साली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मागिल वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली होती, पण इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर अंतिम फेरीत पोहचण्याचे स्वप्न भंगले. (IND vs WI T20)

Back to top button