पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Ranking : आयसीसीने अॅशेस मालिका संपल्यानंतर कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार आणि फलंदाज जो रूटला एका स्थानाचा फायदा झाला असून आता तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ज्यामुळे न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनचे अव्वल स्थान धोक्यात आले आहे. विल्यमसन दुखापतीमुळे बराच काळ मैदानापासून दूर आहे. रूटचे 559 रेटिंग आहेत तर विल्यमसन 883 रेटींगसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेत रूटने 405 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनला (826 रेटींग) फटका बसला आहे. त्याची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. तर त्याचा संघ सहकारी स्टीव्ह स्मिथने (842 गुण) तीन स्थानांनी प्रगती करत तिसरा क्रमांक मिळवला आहे. उस्मान ख्वाजाने एक स्थान पुढे सरकत सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. टॉप-10 कसोटी फलंदाजांच्या यादीत भारताच्या एकमेव खेळाडूचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मा 759 गुणांसह 10 व्या क्रमांकावर कायम आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (829 रेटींग) चौथ्या स्थानावर आहे. (ICC Rankings)
कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (879 रेटींग) अव्वल स्थानावर कायम आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (चार स्थानांनी वर, 776 गुण) चौथ्या क्रमांकावर आहे. ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ओव्हल कसोटी हा त्याचा शेवटचा सामना होता. अॅशेसमध्ये त्याने 22 विकेट घेतल्या. इंग्लंडच्या मार्क वूडने कारकिर्दीतील उच्च रेटिंग प्राप्त करत 21 वे स्थान गाठले आहे. ॲशेसमधील दमदार कामगिरीचा फायदा इंग्लंडच्या ख्रिस वोक्सला (23 वे स्थान) देखील झाला. वोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क यांना संयुक्तपणे मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. स्टार्कने दोन स्थानांची चढाई करत तो 12 व्या स्थानावर पोहोचला आहे.
एकदिवसीय क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही. मात्र, भारताचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने मात्र मोठी झेप घेतली आहे. त्याने 15 स्थानांची प्रगती करत 45 वे स्थान मिळवले आहे. विंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये त्याने शानदार अर्धशतके झळकावली. तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. अर्धशतकांची हॅट्ट्रीक करणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरला. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने विंडिजविरुद्ध शानदार प्रदर्शन केले. एकदिवसीय गोलंदाजांच्या यादीत आठ स्थानांची प्रगती करत तो 14व्या क्रमांकावर पोहोचला आहे.