Hardik Pandya : हार्दिक पंड्याचा विंडिजविरुद्ध करिष्मा, कोहली-कपिल देवला टाकले मागे!

Hardik Pandya : हार्दिक पंड्याचा विंडिजविरुद्ध करिष्मा, कोहली-कपिल देवला टाकले मागे!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Ind vs WI) एक अप्रतिम खेळी साकारली. यादरम्यान त्याने एक मोठा विक्रम केला. तो विंडिजविरुद्धच्या वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार ठरला असून त्याने माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev)आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना मागे टाकले आहे.

त्रिनिदादमध्ये झालेल्या मालिकेतील निर्णायक सामन्यात टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) केले. कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत त्याने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. आपल्या वादळी खेळीदरम्यान त्याने 5 षटकार ठोकले. याआधी कोणत्याही भारतीय दिग्गजाने विंडिजविरुद्धच्या वनडे (Ind vs WI) सामन्यात कर्णधार म्हणून इतके षटकार मारले नव्हते. केवळ विराट कोहलीने (Virat kohli) 2017 मध्ये वनडेमध्ये 4, तर कपिल देव (Kapil Dev) आणि शिखर धवन (Shikhar dhawan) यांनी 3-3 षटकार मारले होते. कपिल यांनी 1983 मध्ये तर धवनने 2022 मध्ये ही कामगिरी केली होती.

विंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय (Ind vs WI) सामन्यात पंड्या (Hardik Pandya) पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला. त्याने सुरुवातीला 24 चेंडूत 12 धावा केल्या, पण त्यानंतर त्याने आपल्या डावाला गती दिली आणि पुढील 28 चेंडूत 58 धावा फटकावल्या. आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने 52 चेंडूंचा सामना करत 70 धावा तडकावल्या. तो 4 चौकार आणि 5 षटकार मारण्यात यशस्वी ठरला. त्याच्या स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त राहिला.

(Hardik Pandya) विंडिजविरुद्ध एका डावात सर्वाधिक षटकार

5 षटकार : हार्दिक पंड्या (2023)
4 षटकार : विराट कोहली (2017)
3 षटकार : कपिल देव (1983)
3 षटकार : शिखर धवन (2022)

मालिका जिंकत भारताच्या नवे विक्रम

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारताने तिसरा आणि निर्णायक सामना 200 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला आणि अनेक विश्वविक्रम केले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा युवा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आणि यावेळी निराशा केली नाही. खरे तर भारताने या मालिकेत पहिल्या सामन्यापासूनच प्रयोग केला. विराट आणि रोहितला दुसऱ्या सामन्यातूनच विश्रांती देण्यात आली. मात्र तो सामना टीम इंडियाने गमावला. तिसऱ्या वनडेत रोहित आणि विराट पुनरागमन करतील अशी शक्यता होती, पण ती काही खरी ठरई नाही. तिसऱ्या वनडेत सर्वांनी चांगली कामगिरी केली. इशान किशन, शुभमन गिल, हार्दिक पंड्या आणि संजू सॅमसन यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 351 धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात कॅरेबियन संघ अवघ्या 151 धावांवर गारद झाला.

त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाविरुद्धचा हा धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा विजय आहे. 2007 मध्ये एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 186 धावांनी पराभव करणाऱ्या इंग्लंडचा विश्वविक्रम भारताने मोडला. त्याचवेळी 2008 मध्ये घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 169 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशाप्रकारे टीम इंडियाने आता वेस्ट इंडिजमध्ये नवा विश्वविक्रम रचला.

धावांच्या बाबतीत विंडिजविरुद्ध भारताचा हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. 2018 मध्ये भारताने मुंबईत त्यांचा 224 धावांनी पराभव केला होता. भारताने विंडिजविरुद्ध सलग 13 एकदिवसीय मालिका जिंकली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news