‘मी कासव आहे, ससा नाही’! हार्दिक पंड्या असं का म्हणाला? | पुढारी

‘मी कासव आहे, ससा नाही’! हार्दिक पंड्या असं का म्हणाला?

ब्रिजटाऊन, पुढारी ऑनलाईन : अगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता मला वर्कलोड वाढवावा लागेल. अधिक षटके गोलंदाजी करावी लागेल. सध्या मी ससा नसून कासव आहे. मात्र विश्वचषक स्पर्धेपूर्वी सर्व सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा बदली कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) दिली. दुस-या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याने मॅच प्रेझेंटेशनदरम्यान भावना व्यक्त केली.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट शर्मा यांना विश्रांती देण्यात आली होती. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. दरम्यान, या सामन्यात कॅरेबियन संघाने बाजी मारली. विंडिजने भारतावर 6 विकेट्सने मात करून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पराभवानंतर टीम इंडियाचा बदली कर्णधार पंड्याने फलंदाजांना धारेवर धरले आणि त्यांच्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.

पंड्या म्हणाला, ‘आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी करणे अपेक्षित होते, तशी फलंदाजी झाली नाही. पहिल्या डावाच्या तुलनेत विकेट फार चांगली झाली. आम्ही निराश आहोत, पण फार काही शिकण्याची संधीही मिळाली आहे. आमची सलामी चांगली झाली. गिल-इशानने आश्वासक सुरुवात करून दिली. पण ती लय आमच्या इतर फलंदाजांनी बिघडवली. यामुळे आमच्या पराभवाचे प्रमुख कारण हे खराब फलंदाजी आहे. गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने प्रभावित केले. विंडिजच्या होपने कर्णधाराला साजेशी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला कार्टीने तितकीच मोलाची साथ दिली आणि विजय मिळवला. आता मालिका बरोबरीत असल्याने प्रेक्षकांसह खेळाडूंसाठीही तिसरा सामना खूप रोमांचक ठरेल,’ असे भाकितही त्याने केले.

अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याचा गोलंदाज म्हणून संयमाने वापर केला जात आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने तीन षटकांत 17 धावा देऊन एक विकेट घेतली, तर दुसऱ्या सामन्यात त्याचे विकेटचे खाते रिकामे राहिले आणि त्याने 6.4 षटकांत 38 धावा दिल्या. फलंदाजीतही त्याची कामगिरी प्रभावी ठरली नाही. त्याला केवळ 7 धावा करता आल्या.

या सामन्यात भारतीय संघ अवघ्या 181 धावांत गारद झाला. त्यानंतर वेस्ट इंडिजने हे आव्हान 80 चेंडू राखून 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. आता दोन्ही संघांमधील पुढील सामना 1 ऑगस्ट रोजी त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

Back to top button