पुढारी ऑनलाईन डेस्क : Stuart Broad Retirement : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने शनिवारी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या अॅशेस कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने ही माहिती दिली. ओव्हल कसोटी त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी असेल. तो यापुढे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळणार नाही. 37 वर्षीय ब्रॉड म्हणाला की, त्याच्या क्रिकेट प्रवासात त्याने जे काही मिळवले आहे, त्यामुळे तो आनंदी आणि समाधानी आहे. ब्रॉडने ऑगस्ट 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या 17 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम केले. चला तर ब्रॉडच्या 12 आश्चर्यकारक विक्रमांबद्दल माहिती घेऊया.
1. ब्रॉड सध्या कसोटी क्रिकेटमधील पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. मात्र, एका टप्प्यावर ब्रॉडची कारकीर्द धोक्यात आली जेव्हा भारताच्या युवराज सिंगने त्याला एका षटकात सहा षटकार ठोकले. 2007 च्या पहिल्यावहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवीने 17 व्या षटकात सलग 6 षटकार ठोकले होते. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात सहा षटकार खाणारा ब्रॉड हा पहिला गोलंदाज आहे.
2. ॲशेसमध्ये वेगवान गोलंदाजाने एका डावात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम ब्रॉडच्या नावावर आहे. त्याने 2015 च्या ट्रेंट ब्रिज कसोटीच्या पहिल्या डावात 9.3 षटकांमध्ये 15 धावांत 8 बळी घेतले होते. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 78 धावांनी जिंकला होता.
3. ब्रॉड हा कसोटी क्रिकेटमध्ये दोनदा हॅट्ट्रिक घेणाऱ्या चार गोलंदाजांपैकी एक आहे. वसीम अक्रमनंतर दोन कसोटी हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज आहे. ब्रॉडने 2011 मध्ये भारत आणि 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध हा पराक्रम केला होता.
4. ब्रॉड हा कसोटी इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज आहे. 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याने एका षटकात 35 धावा दिल्या होत्या. जसप्रीत बुमराहने त्याची धुलाई केली होती.
5. कसोटीत 600 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा ब्रॉड हा जगातील दुसरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने 167 सामन्यात 602 विकेट घेतल्या आहेत. ब्रॉडचा देशबांधव जेम्स अँडरसन (180 सामन्यांत 690) कसोटी विकेट घेणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहे.
6. ब्रॉड हा अॅशेस मालिकेत 150 बळी घेणारा इंग्लंडचा एकमेव गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 40 सामन्यांत 151 विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. त्याने अलीकडेच इंग्लंडचा माजी दिग्गज इयान बॉथमला (148) मागे टाकले होते.
7. ब्रॉड हा सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर (200), जेम्स अँडरसन (183*), रिकी पाँटिंग (182), स्टीव्ह वॉ (168) यांच्यानंतर सहाव्या क्रमांकावर आहे. 30 ऑगस्ट 2006 रोजी पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्रॉडने शेवटचा वनडे 14 फेब्रुवारी 2016 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तर 2014 मध्ये त्याने शेवटचा टी-20 सामना खेळला. 2010 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचाही तो भाग होता.
8. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजीची जोडी आहे. दोघांनी मिळून 138 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 1037 फलंदाजांची शिकार केली. त्यांच्याशिवाय फक्त शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा या जोडीनेच 1000 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन जोडीने एकत्र खेळताना 104 सामन्यात 1001 बळी मिळवले.
9. स्टुअर्ट ब्रॉडने मायदेशात 396 विकेट्स घेत आहेत. मुथय्या मुरलीधरन (493) आणि जेम्स अँडरसन (434) नंतर घरच्या मैदानावर सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे.
10. ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 17 वेळा डेव्हिड वॉर्नरला बाद केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
11. ब्रॉड हा असा गोलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये किमान 10 वेळा सहा फलंदाजांना बाद केले आहे. इतर कोणत्याही गोलंदाजाने असा पराक्रम केलेला नाही. ग्लेन मॅकग्रा, कर्टली अॅम्ब्रोस, कपिल देव, माल्कम मार्शल आणि कोर्टनी वॉल्श यांनी कसोटी क्रिकेटमध्ये किमान 10 वेळा पाच फलंदाजांना बाद केले होते.
12. 2019 पासून ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 169 बळी घेतले आहेत, जे या कालावधीतील कोणत्याही गोलंदाजापेक्षा सर्वाधिक आहेत.