हरमनप्रीत कौर हिच्यावर दोन सामन्यांची बंदी | पुढारी

हरमनप्रीत कौर हिच्यावर दोन सामन्यांची बंदी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला आयसीसीकडून मोठा धक्का बसला असून तिच्यावर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. बांगला देशमधील वन डे मालिका संपल्यानंतर हरमनप्रीत कौर तिच्या वाईट वागणुकीमुळे चर्चेत आहे. बांगला देशातील मालिका संपल्यानंतर हरमनप्रीतने खराब अंपायरिंगवरही वक्तव्य केले होते. तसेच आऊट झाल्यानंतर तिने बॅट स्टंपवरही मारली होती.

याशिवाय ट्रॉफी मिळाल्यानंतर प्रेझेंटेशन सोहळ्यातही तिने बांगलादेशी संघाशी गैरवर्तन केले. या सर्व कारणांमुळे आता तिच्यावर बंदीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. मात्र, आयसीसीकडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आता मंगळवारी भारतीय कर्णधाराला आयसीसीकडून मोठा धक्का बसला आहे.

याप्रकरणी हरमनप्रीतवर सामना शुल्काच्या 75 टक्के दंड लावण्यात आला होता. याशिवाय तिला तीन डिमेरिट पॉईंटस्ही देण्यात आले होते. याच्या आधारावर तिच्यावर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यातून बंदीची शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या एशियन गेम्समध्ये हरमनप्रीत पहिल्या दोन सामन्यांत भारताकडून खेळू शकणार नाही. हरमनप्रीतने चुकीची कबुली दिली असल्यामुळे त्यासाठी सुनावणीची गरज भासली नाही.

क्रमवारीतही फटका

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही भारतीय कर्णधाराला फटका बसला आहे; तर दुसरीकडे उपकर्णधार स्मृती मानधना हिला याचा फायदा झाला आहे. बांगला देशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात स्वस्तात बाद झालेल्या भारतीय कर्णधाराला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. ती आता सहाव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरली आहे. दुसरीकडे मंधानाला एका स्थानाचा फायदा झाला असून ती सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर गेली आहे.

हेही वाचा…

Back to top button