Team India Performance : टीम इंडियाला विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून काय मिळाले? | पुढारी

Team India Performance : टीम इंडियाला विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून काय मिळाले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Performance : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. ही मालिका टीम इंडिया 2-0 ने जिंकू शकली असती, पण दुसरी कसोटी पावसाने वाहून गेली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी नव्या पर्वाची सुरुवात सोपी नव्हती. निवडकर्त्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना वगळले आणि काही नवीन खेळाडूंना संधी दिली. हा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झाला असून संघाला अनेक सकारात्मक गोष्टी मिळाल्या आहेत.

भारतीय संघासाठी काय सकारात्मक?

अश्विनचे ​​कसोटी संघात शानदार पुनरागमन
भारतीय संघ व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलमधून आर अश्विनचा पत्ता कट केला होता. त्याला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले होते. मात्र, विंडिजविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात अश्विनला पुन्हा मैदानात उतरण्याची संधी मिळाली, ज्याचे त्याने सोने केले. भारताचा हा दिग्गज फिरकीपटू दोन कसोटी सामन्यात 12 बळी घेण्यात यशस्वी झाला. यादरम्यान त्याने दोन वेळा एका डावात पाच बळी घेण्याची किमया केली.

Pudhari Cricket WhatsApp Group

यशस्वी जैस्वाल एक शानदार सलामीवीर
डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल याला पदार्पणाची संधी देण्यात आली आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा उठवला. यशस्वीने कसोटी पदार्पणाच्या डावात शतक झळकावले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्याने आपल्या खेळीदरम्यान अनेक उत्कृष्ट फटके मारले. गरजेनुसार तो आपल्या खेळाची गती बदलत होता हे त्याच्या एकून खेळीचे वैशिष्ट्य राहिले. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही त्याने रोहितसह दमदार सुरुवात केली. या मालिकेत यशस्वीने सर्वाधिक धावा केल्या. दोन सामन्यांच्या तीन डावात त्याने 88.67 च्या सरासरीने 266 धावा आपल्या खात्यात जमा केल्या. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. (Team India Performance)

कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला
काही दिवसांपासून रोहितच्या फॉर्मची बरीच चर्चा होती. तो सातत्याने अपयशी ठरत होता. त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. पण विंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने गरजेनुसार फलंदाजी केली. रोहितच्या शॉट्समध्ये सकारात्मकता होती आणि तो पूर्ण आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसला. या मालिकेत सर्वाधिक धावा करण्यात रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने तीन डावात 80 च्या सरासरीने 240 धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

किंग कोहलीची शानदार खेळी
गेल्या वर्षभर विराट कोहलीने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. पण कसोटीत त्याल सुर गवसत नव्हता. 2019 पासून या वर्षी मार्चपर्यंत तो या फॉरमॅटमध्ये शतक झळकावू शकला नव्हता. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत त्याला फारशी आश्वासक कामगिरी करता आली नाही. विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीने दोन डावांत 98.50 च्या सरासरीने 197 धावा केल्या. त्याने एका डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात 121 धावा केल्या.

कसोटीत भारताला नवा स्ट्राईक गोलंदाज मिळाला
मोहम्मद सिराज गेल्या काही काळापासून भारताचा नवा स्ट्राईक गोलंदाज म्हणून उदयास आला आहे. 2020-21 मधील ऑस्ट्रेलिया दौरा आणि 2021 मधील इंग्लंड दौऱ्याने सिराजच्या कसोटी कारकिर्दीत भर घातली. बुमराह आणि शमीच्या अनुपस्थितीत सिराजने स्ट्राईक बॉलरची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. त्याने विंडिजविरुद्धच्या दोन कसोटीत सात विकेट्स घेतल्या. यामध्ये पाच विकेट्स हॉलचाही समावेश आहे. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा तो संयुक्तरित्या दुसरा गोलंदाज ठरला आहे. (Team India Performance)

ईशान आणि मुकेशचे स्वप्नवत पदार्पण
यशस्वीप्रमाणेच यष्टिरक्षक इशान किशन आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांनाही वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली. दोघांनीही आपल्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली. यष्टीरक्षणाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळत इशान सतत आपल्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना प्रेरित करताना दिसला. त्याला पहिल्या कसोटीत फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. पण दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात जेव्हा टीम इंडियाला आक्रमक फलंदाजी करून धावा जोडायच्या होत्या तेव्हा ईशानने 33 चेंडूत कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्यामुळे टीम इंडियाला विंडिजसमोर मोठे लक्ष ठेवता आले. त्याचवेळी मुकेशला दुसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. त्याने अचूक लाइन लेन्थने सर्वांना प्रभावित करत दोन विकेट मिळवल्या.

‘या’ चुकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही (Team India Performance)

तिसर्‍या क्रमांकावर शुभमन गिल फेल…
यशस्वी जैस्वालच्या पदार्पणामुळे शुभमन गिलला फलंदाजीचा क्रम बदलावा लागला. त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. यापूर्वी चेतेश्वर पुजारा या बॅटिंग पोझिशनवर मैदानात उतरायचा. पण त्याला विंडिज दौ-यातून वगळण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत या क्रमांकावर कोण खेळेल याची उत्सुकता सर्वांना लागली होती. त्याचवेळी पहिल्या कसोटीत शुभमन गिलला तिस-या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. पण या क्रमांकावर तो फारशी चमक दाखवू शकला नाही. पहिल्या कसोटीत तो सहा धावांवर बाद झाला, तर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याला 10 धावा करता आल्या. तर याच कसोटीच्ता दुस-या डावात तो नाबाद 29 धावा करू शकला. तथापि, त्याच्याबाबतीत एवढ्या लवकर निष्कर्ष काढता येणार नाही, तोही एक खेळाडू जो आगामी काळात टीम इंडियाचे भविष्य मानला जात आहे.

रहाणेचा फॉर्म पुन्हा खराब
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर आणि केएल राहुल जखमी झाल्याने अजिंक्य रहाणेची निवड करण्यात आली होती. या संधीचा फायदा घेत त्याने शानदार खेळी खेळली. या खेळीमुळे तो वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उपकर्णधार बनला, पण दोन सामन्यांमध्ये त्याला फारशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या कसोटीत तीन तर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने केवळ आठ धावा केल्या. श्रेयस आणि राहुल जवळपास तंदुरुस्त आहेत. अशा स्थितीत रहाणेने चांगली फलंदाजी केली नाही तर त्याला संघातून पुन्हा डच्चू देण्यात येऊ शकतो.

जयदेव उनाडकटकडून अपेक्षा भंग
उनाडकटला विंडिजविरुद्धच्या दोन्ही कसोटीत संधी मिळाली, पण लाल चेंडूने भेदक मारा करण्यात तो अपयशी ठरला. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 7 षटकात 17 धावा दिल्या आणि एकही विकेट मिळवता आली नाही. दुसऱ्या डावात दोन षटकात एक धाव दिली आणि विकेटच्या बाबतीत त्याचे खाते रिकामे राहिले. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 16 षटके टाकली आणि 44 धावा दिल्या, यावेळीही त्याला एकसुद्धा बळी घेता आला नाही. त्याचवेळी उनाडकटने दुसऱ्या डावात तीन षटके टाकली आणि हे स्पेलसुद्धा विकेटरहित गेले. अशा स्थितीत उनाडकटला पुढील कसोटी मालिकेतून वगळले जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भारताला आता डिसेंबरपूर्वी कोणतीही कसोटी खेळायची नाही. टीम इंडिया डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. तेथे संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तोपर्यंत बुमराह, राहुल, श्रेयस आणि प्रसिद्ध कृष्णा फिट होतील. अशा स्थितीत रहाणे आणि उनाडकटचे संघातील स्थान धोक्यात आलेले दिसते. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत ईशानला पुन्हा संधी मिळू शकते. मात्र, द. आफ्रिका दौऱ्याला अद्याप बराच विलंब आहे. क्रिकेटमधील समीकरणे खूप लवकर बदलतात, परंतु अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीसाठी काहीही सोपे असणार नाही हे नक्की.

Back to top button