Emiliano Martinez : अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या मार्टिनेझचे भारतात जंगी स्वागत | पुढारी

Emiliano Martinez : अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या मार्टिनेझचे भारतात जंगी स्वागत

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारा आणि गोल्डन ग्लोव्ह मानकरी एमिलियानो मार्टिनेझ सध्या भारत दौऱ्यावर आहे. सोमवारी (दि.३) कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी चाहत्यांनी त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. (Emiliano Martinez)

२०२२ साली कतार येथे झालेल्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मार्टिनेझने केलेल्या शानदार कामगिरीमुळे अर्जेंटिनाने फ्रान्सवर पेनल्टीमध्ये विजय मिळवला होता. या सामन्यात उत्कृष्ट पेनल्टी सेव्ह आणि गोलकीपिंगसाठी त्याला गोल्डन ग्लोव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (Emiliano Martinez)

भारतात येणे हे एक स्वप्न : मार्टिनेझ

एमिलियानो मार्टिनेझने विमानतळावर भव्य स्वागत स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, मी भारतात येण्यासाठी खूप उत्सुक होतो. भारतात येण्याचे माझे स्वप्न होते. मला येथे आल्याचा आनंद आहे. विमानतळावर मार्टिनेझला पाहण्यासाठी फुटबॉल चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

मार्टिनेजच्‍या हस्‍ते हाेणार ‘पेले-मॅराडोना-सोबर्स गेट’चे उद्घाटन

विमानतळावर जोरदार स्वागत केल्यानंतर मार्टिनेझ हॉटेलकडे रवाना झाला. त्याच्या भारतात येण्याचे कारण एक कार्यक्रम आहे. मार्टिनेझ मंगळवारी (दि.४) कोलकातील फुटबॉल मोहन बागान क्लबच्या ‘पेले-मॅराडोना-सोबर्स गेट’चे उद्घाटन करणार आहे.

ममता बॅनर्जी यांच्‍यासह सौरव गांगुलीची घेणार भेट

मार्टिनेझ भारतात ३ दिवसांच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान तो संतोष मित्र चौकातील शाळकरी मुलांनाही भेटणार आहे. तो मोहन बागान क्लब येथे पेले, दिएगो गेटचे उद्घाटन करणार आहे. यावेळी मार्टिनेझ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची भेट घेणार आहे.

हेही वाचा;

Back to top button