Ashes 2023 : ऑस्ट्रेलियाकडे 221 धावांची एकत्रित आघाडी | पुढारी

Ashes 2023 : ऑस्ट्रेलियाकडे 221 धावांची एकत्रित आघाडी

लंडन; वृत्तसंस्था : बेन डकेट (98), हॅरी ब्रूक (50) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने येथील दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्व बाद 325 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर 2 बाद 130 धावांपर्यंत मजल मारत आपली एकत्रित आघाडी 221 धावांपर्यंत नेली. (Ashes 2023)

तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव 325 धावांवर रोखण्यात जलद गोलंदाज मिशेल स्टार्कचा महत्त्वाचा वाटा राहिला. त्याने 17 षटकांत 88 धावांत 3 बळी घेतले; तर जोश हॅझलवूड, ट्रॅव्हिस हेड यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. (Ashes 2023)

शुक्रवारी या सामन्याच्या तिसर्‍या दिवशी इंग्लंडने 4 बाद 278 या मागील धावसंख्येवरून डावाला पुढे सुरुवात केली. मात्र, या धावसंख्येत त्यांना आणखी केवळ 47 धावांची भर घालता आली. इंग्लंडच्या डावात बेन डकेटने सर्वाधिक 98 धावांचे योगदान दिले. त्याचे शतक केवळ 2 धावांनी हुकले असले, तरी या खेळीमुळे इंग्लंडला त्रिशतकी मजल सहज पार करता आली.

डकेटने 199 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत 134 चेंडूंचा सामना केला. त्याच्या या खेळीत 9 चौकारांचा समावेश राहिला. हॅरी ब्रूकनेदेखील तडफदार अर्धशतक झळकावत 68 चेंडूंत 4 चौकारांसह 50 धावांचे योगदान दिले. याशिवाय, झॅक क्राऊलीने 48 चेंडूंत 48, तर ऑली पोपने 63 चेंडूंत 42 धावांचे योगदान दिले. इंग्लंडच्या अन्य फलंदाजांना मात्र फारशी चमक दाखवता आली नाही.

ऑस्ट्रेलियातर्फे जलद गोलंदाज मिशेल स्टार्कने सर्वात किफायतशीर मारा करताना 17 षटकांत 88 धावांत 3 बळी घेतले. याशिवाय, जोश हॅझलवूडने 13 षटकांत 71 धावांत 2, तर ट्रॅव्हिस हेडने 7 षटकांत केवळ 17 धावांत 2 फलंदाजांना बाद केले. पॅट कमिन्स, नॅथन लियॉन व कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी या डावात 22 अवांतर धावा दिल्या. सामन्यातील पहिल्या डावात 416 धावांचा डोंगर रचणारा ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावाअखेर 91 धावांनी आघाडीवर राहिल्याचे यामुळे स्पष्ट झाले.

ऑस्ट्रेलियाची 2 बाद 130 धावांपर्यंत मजल

शनिवारी दिवसअखेर, ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसर्‍या डावात 45.4 षटकांत 2 बाद 130 धावा जमवल्या होत्या. याचवेळी पावसाचा व्यत्यय आला आणि यानंतर खेळ होऊ शकला नाही. पहिल्या डावाअखेर 91 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या डावातही दमदार सुरुवात केली. उस्मान ख्वाजा 123 चेंडूत 58 धावांवर नाबाद राहिला, तर डेव्हिड वॉर्नर 76 चेंडूंत 25 धावांवर पायचित झाला. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 24.1 षटकांत 63 धावांची सलामी नोंदवली. ऑस्ट्रेलियाकडे आता या लढतीत एकत्रित 221 धावांची आघाडी आहे.

तिसर्‍या स्थानावरील मार्नस लॅबुशेनने 51 चेंडूंत 5 चौकारांसह 30 धावा केल्या. जलद गोलंदाज अँडरसनने त्याला ब्रूककरवी झेलबाद केले. पावसाच्या व्यत्ययाने खेळ थांबवावा लागला, त्यावेळी अर्धशतकवीर उस्मान ख्वाजासह स्टिव्ह स्मिथ 6 क्रीजवर होते. गोलंदाजीच्या आघाडीवर इंग्लिश संघातर्फे जेम्स अँडरसन व जोश टंग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

हेही वाचा; 

Back to top button