लातुरच्या युवकास दिल्लीत डांबले; मागितली ४५ लाखांची खंडणी | पुढारी

लातुरच्या युवकास दिल्लीत डांबले; मागितली ४५ लाखांची खंडणी

लातूर, पुढारी वृतसेवा : बीजनेस डिलसाठी येथील एका युवकास दिल्लीला बोलावून त्याला डांबून ४५ लाखाची मागणी करीत १७ लाख उकळणाऱ्यांना चौघांना  पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संजयकुमार महावीर सिंग (वय ३६, रा. सेक्टर- ७ दिल्ली), महेश सतीश अरोडा (वय ४०, रा. पीरमुचल्ला झिरकपूर एसएएस नगर, मोहाली पंजाब), अतुल वीरेंद्र उपाध्याय (वय ३७, रा. मणीमांजरा चंदीगढ), वीरसिंह जयेश रावत (वय ४४, रा. गढवाली मोहल्ला, लक्ष्मीनगर, दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना शुक्रवारी लातुरात आणले.

याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी दिलेली माहिती अशी की, येथील एलआयसी कॉलनितील सागर अनिल जाजनूरकर हा युवक क्रिप्टो करन्सी व्यवसाय करतो. युट्युबवरुन त्याची उपरोक्त व्यक्तींशी ओळख झाली. कमी रकमेत मी अधिक क्वाईन देतो असे सागरने त्यांना सांगितले व त्यांनी सागरला ४५ लाख रुपये दिले. तथापि सागरने दिलेले क्वाईन त्यांना मिळाले नसल्याने त्यांनी सागरकडे तगादा लावला. त्यांनी त्याला प्रथम पुण्याला व त्यानंतर विमानाने दिल्लीला बोलावले. सागर व त्याचा मित्राने दिल्ली गाठली. तेथे त्यांनी पैशाची मागणी करीत त्यांना एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवले. दरम्यान सागरच्या वडीलांनी याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली व हे प्रकरण गंर्भियाने घेत पोलिसांनी सुत्रे हलवली.

पोलिस अधीक्षक सायम मुई यानी पथक नियुक्त करून सूचना दिल्या. पालिस उपनिरीक्षक महेश गळगटे, सहायक फौजदार विलास फुलारी, पोलिस हवालदार दिनेश हवा, सारंग लाव्हरे यांचे पथक तातडीने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीमधून सागर अनिल जाजनूरकर आणि त्याच्या मित्राची सुटका केली व आरोपींना लातुरात आणले. दरम्यान सागरने एकास त्याचा पासवर्ड दिला व त्याने ती रक्कम हडपल्याचे सागरचे म्हणणे असून याबाबत पोलिस अधिक तपास करीत असल्याचे शहर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांनी सांगितले. अपहरण झाल्यानंतर आरोपींनी सागर व त्याच्या मित्राकडून १७ लाख रुपये ऑनलाईन व रोखीने घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button