BCCI vs Pakistan : पाकिस्तानला दणका, BCCI-ICCने दाखवल्या वाटाण्याच्या अक्षता | पुढारी

BCCI vs Pakistan : पाकिस्तानला दणका, BCCI-ICCने दाखवल्या वाटाण्याच्या अक्षता

पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI vs Pakistan : विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर होताच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, पीसीबीने नखरे करत आपल्या काही सामन्यांची ठिकाणे बदलण्याची मागणी केली होती, मात्र आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही मागणी फेटाळून लावत त्यांना वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपाड झाला आहे.

अशातच मंगळवारी विश्वचषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पीसीबीने भारतात जाण्यासाठी आम्हाला पाकिस्तान सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असे पीसीबीने म्हटले आहे. बोर्डाच्या प्रवक्त्याने हा खुलासा केला आहे. ‘कोणत्याही दौऱ्यासाठी पाकिस्तान सरकारची आवश्यक आहे. त्यामुळे भारतातील नियोजित विश्वचषक स्पर्धेसाठी आम्ही सरकारशी संपर्क सुरू केला असून त्यांच्याकडून आम्हाला प्रतिसाद मिळाल्यानंतरच आम्ही आयसीसीला याबाबत माहिती देऊ,’ असेही पीसीबीने म्हटले आहे.

पीसीबीला ठिकाण का बदलायचे होते? (BCCI vs Pakistan)

चेपॉकच्या मैदानावर फिरकीपटूंना अनुकूल अशी खेळपट्टी आहे. अशातच अफगाणिस्तानमध्ये रशीद खान, मुजीब उर रहमान आणि नूर अहमद यांच्यासह लक्षवेधी फिरकी गोलंदाज आहेत जे पाकिस्तानसाठी मोठा धोका असू शकतात. तर, बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदान फलंदाजांसाठी चांगले आहे तिथे धावसंख्येचा पाठलाग सहज करता येतो. दोन्हीपैकी एकाही सामन्यात ते फेव्हरिट नसतील, अशी भीती पाकिस्तानला आहे. याच कारणास्तव त्यांनी स्थळ बदलण्याची मागणी केली.

ठिकाणांची आदलाबदली करण्यासाठी आग्रह

मनोरंजक गोष्ट म्हणजे पाकने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदली करण्याचा आग्रह केला. म्हणजे ऑस्ट्रेलियाशी चेपॉक येथे आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चिन्नास्वामी मैदानावर खेळला जावा असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, आयसीसी आणि बीसीसीआयने पीसीबीची मागणी फेटाळून लावत त्यांनी आपले सामने नेमून दिलेल्या ठिकाणीच खेळवायचे आहेत, असा इशारा दिला आहे.

पाकिस्तानच्या सामन्यांचे वेळापत्रक (BCCI vs Pakistan)

पाकिस्तानचा संघ 6 ऑक्टोबरला क्वालिफायर-1 संघाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यांना हैदराबादमध्ये दोन, अहमदाबादमध्ये एक, बंगळूरमध्ये दोन, चेन्नईमध्ये दोन आणि कोलकात्यात दोन सामने खेळायचे आहेत.

आणखी वाचा :

Back to top button