World Cup 2023 : ‘या’10 मैदानांवर होणार वर्ल्डकप सामन्यांचे आयोजन, जाणून घ्या..

World Cup 2023 : ‘या’10 मैदानांवर होणार वर्ल्डकप सामन्यांचे आयोजन, जाणून घ्या..
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : World Cup 2023 : आयसीसीने 2023 च्या क्रिकेट विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. ही संपूर्ण स्पर्धा भारतात खेळवली जाणार असून यासाठी 12 शहरांमधील 10 मैदाने निश्चित करण्यात आली आहेत. तेथे एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये राऊंड रॉबिनचे 45, बाद फेरीचे तीन आणि एका अंतिम सामन्याचा समावेश आहे.

आयसीसीने आणि बीसीसीआय यांनी एकत्रितपणे अहमदाबाद, दिल्ली, धर्मशाला, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई, पुणे, लखनौ आणि कोलकाता या शहरांची 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवड केली आहे. तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटी तसेच हैदराबाद येथे सराव सामने खेळवले जातील. पहिला आणि दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि कोलकाता येथे खेळवला जाईल, तर अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. (World Cup 2023)

1. अहमदाबाद

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबाद येथे अंतिम वर्ल्डकपचा अंतिम सामना होणार आहे. तसेच त्या आधी येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासह एकूण 5 सामने खेळवले जाणार आहेत. या स्टेडियममध्ये 1 लाखांहून अधिक प्रेक्षक बसून सामना पाहू शकतात.

2. दिल्ली

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्येही एकूण 5 सामने खेळवले जातील. येथे टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध असेल. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता सुमारे 41 हजार आहे. या मैदानाची खेळपट्टी संमिश्र आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळते आणि फलंदाज यशस्वी झाल्यास धावाही भरपूर काढल्या जातात.

3. धर्मशाला

हिमाचल प्रदेशच्या धरमशाला येथील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये 5 सामने होणार आहेत. या स्टेडियममध्ये 23 हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था आहे. या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे.

4. चेन्नई

50 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले चेन्नईचे चेपॉक स्टेडियम हे भारतातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. या स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी चाहत्यांची नेहमीच गर्दी असते. भारताला आपला सलामीचा सामना याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. या मैदानावर फिरकीपटूंना खूप मदत मिळते.

5. लखनौ

लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्डकपचे पाच सामने खेळवले जाणार आहेत. येथे यजमान भारतीय संघ इंग्लंडला भिडणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकुल आहे, पण वर्ल्डकप स्पर्धेसाठी खेळपट्ट्या वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आल्याचे समजते आहे. त्यामुळे सामन्याची परिस्थिती ज्या-त्या वेळीच समजेल. या मैदानाची प्रेक्षक क्षमता 50 हजार आहे.

6. पुणे

पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडियमवरही पाच सामने खेळवले जातील, ज्यामध्ये एक सामना भारताचा आहे. टीम इंडियाची येथे बांगलादेशशी लढत होणार आहे. या स्टेडियमची आसन क्षमता जवळपास 37,500 एवढी आहे. या मैदानावरही फिरकीपटूंचे वर्चस्व दिसते.

7. मुंबई

वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आमने सामने असतील. हा सामना 21 ऑक्टोबरला होणार आहे. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 24 ऑक्टोबरला पुढील सामना होणार आहे. टीम इंडियाची वानखेडे स्टेडियमवर 2 नोव्हेंबरला क्वालिफायर संघाशी लढत होणार आहे. 7 नोव्हेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होईल. त्यानंतर या स्टेडियमवर 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना खेळवला जाईल. वानखेडे स्टेडियमवर भारताने 2011 साली वर्ल्डकपचे विजेतेपद उंचावले होते. या स्टेडियमची क्षमता 32 हजार आहे. येथे फलंदाजांचे वर्चस्व आहे.

8. बंगळूर

बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरही पाच सामने खेळवले जाणार आहेत. टीम इंडिया या मैदानावर विश्वचषक स्पर्धेच्या पात्रताफेरीतून अंतिम दहामध्ये आलेल्या एका संघाविरुद्ध खेळणार आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 32 हजार आहे.

9. कोलकाता

कोलकाताचे ईडन गार्डन स्टेडियम अनेक ऐतिहासिक सामन्यांचे साक्षीदार आहे. यावेळी येथे उपांत्य फेरीसह एकूण 5 सामने खेळले जातील, ज्यामध्ये एक सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 68 हजार आहे. येथे फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये चांगलीच लढत पहायला मिळते.

10. हैदराबाद

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला ​​तीन सामन्यांचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. येथे भारताचा एकही सामना खेळवला जाणार नाहीय. पाकिस्तानचा संघ येथे दोन सामने खेळणार आहे. या स्टेडियममध्ये 45 हजार प्रेक्षक एकत्र बसून सामना पाहू शकतात.

आणखी वाचा..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news