Cheteshwar Pujara : पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद? | पुढारी

Cheteshwar Pujara : पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली. चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव या सीनियर खेळाडूंना कसोटी संघातून वगळण्यात आले. वर्ल्ड चॅम्पियशिपच्या दोन वर्षांच्या सत्राचा विचार करून पुजाराला संघाबाहेर करण्यात आले असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. (Cheteshwar Pujara)

पुजाराचा फॉर्म गेल्या काही दिवसांपासून चांगला नाही. कौंटी क्रिकेटमध्ये तो धावा करत आहे, पण टीम इंडियासाठी त्याच्या बॅटमधून फारशा धावा निघालेल्या नाहीत. अशा स्थितीत निवड समितीने त्याला पुन्हा एकदा संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद झाले असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. (Cheteshwar Pujara)

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया मालिकेत अपयशी ठरल्यानंतर त्याच्यासाठी फार कमी संधी उरल्या होत्या; परंतु निवडकर्त्यांना डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी बदल करायचे नव्हते. ओव्हलवरील त्याच्या कामगिरीवरून हे सिद्ध झाले की आता त्याला संघात फार कमी संधी मिळतील. निवडकर्ते एस. एस. दास डब्ल्यूटीसी फायनलसाठी लंडनमध्ये होते. त्यांनी आपले मत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी बोलून त्यांना सांगितले असावे आणि फायनलनंतरच्या घेतल्या जाणार्‍या निर्णयाची माहिती दिली.

बीसीसीआयच्या सूत्रांनी पुढे सांगितले की, डब्ल्यूटीसी ही दोन वर्षे चालणारी मालिका आहे आणि पुजाराने तीन वर्षांपासून धावा केल्या नाहीत. विराट कोहली आणि पुजारा यांच्यात फक्त लयीचा फरक आहे. कोहलीचाही एक वाईट टप्पा होता, पण तो कधीच फॉर्मबाहेर दिसला नाही.

हेही वाचा;

Back to top button