R Ashwin : धोनीच्या नेतृत्वाखाली खेळाडूंच्या मनात सुरक्षिततेची भावना असायची : अश्विन | पुढारी

R Ashwin : धोनीच्या नेतृत्वाखाली खेळाडूंच्या मनात सुरक्षिततेची भावना असायची : अश्विन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव होऊन अनेक आठवडे झाले असतील, पण खेळाडूंच्या हृदयात अजूनही वेदना कायम आहेत. विशेषत: रविचंद्रन अश्विन (R Ashwin), ज्याला संघ व्यवस्थापनाने प्रथम प्लेईंग इलेव्हनमधून वगळले आणि नंतर भारताचा 209 धावांनी लाजिरवाणा पराभव पाहिला.

आता अश्विनने (R Ashwin) एका मुलाखतीत कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर भाष्य केले असून धोनीच्या नेतृत्वाखालील संघात खेळाडूंच्या मनात सुरक्षिततेची भावना असायची, असे त्याने म्हटले आहे. म्हणजेच रोहित आणि द्रविडच्या संघात ती नाही, असे त्याने आडवळणाने म्हटले आहे.

अश्विनने रोहित आणि द्रविडकडे बोट दाखवत धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. धोनीने भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. निवडलेल्या संघातील खेळाडूंना दिलेली सुरक्षिततेची भावना हे धोनीच्या यशामागील कारण असल्याचे 36 वर्षीय खेळाडूने नमूद केले.

दोन आठवड्यांत ही दुसरी वेळ आहे जेव्हा अश्विनने (R Ashwin) खेळाडूंच्या मनात ‘सुरक्षेची भावना’ जागृत करण्याचे महत्त्व सांगितले. तो म्हणाला, ‘मी चाहत्यांची निराशा समजू शकतो, पण कोणताही खेळाडू एका रात्रीत बदलत नाही. आपल्यापैकी बरेच जण एम.एस. धोनीच्या नेतृत्वाबद्दल बोलतात. मी अनेक वर्षे माहीच्या कर्णधारपदाखाली खेळलो. त्याने गोष्टी अगदी साध्य ठेवल्या. तो 15 जणांचा संघ निवडायचा. त्यानंतर त्याच 15 जणांना पुढील संघातही संधी देण्यात आली. वर्षभर तो एकच प्लेईंग इलेव्हन खेळवायचा. सुरक्षेची भावना खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची असते.’

Back to top button