ASIA CUP 2023 : आधी विरोध.., नंतर मान्यता | पुढारी

ASIA CUP 2023 : आधी विरोध.., नंतर मान्यता

कराची; वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नियोजित अध्यक्ष झका अश्रफ यांनी आशिया कप 2023 चे हायब्रीड मॉडेलला विरोध दर्शवला होता. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेच्या भवितव्यावर पुन्हा एकदा टांगती तलवार आली होती, पण आता झका यांनी आपल्या वक्तव्यावर यू टर्न घेतला असून आपल्याला मान्य नसला तरी पूर्वीच्या अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आपण अमलात आणणार असल्याचे झका यांनी म्हटले आहे. (ASIA CUP 2023)

झका अश्रफ यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आशिया चषक पाकिस्तानातच होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पुन्हा आशिया चषक स्पर्धेसमोर संकट उभे राहिले होते. पण, पलटी मास्टर असलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. अश्रफ यांनी त्यांच्याच विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. पीसीबीने आधी घेतलेल्या निर्णयात आम्ही कोणताच अडथळा निर्माण करणार नाही, अशी सारवासारव त्यांनी केली. (ASIA CUP 2023)

अश्रफ म्हणाले, हे संपूर्ण हायब्रीड मॉडेल पाकिस्तानसाठी फायदेशीर नाही आणि मला ते वैयक्तिकरीत्या आवडले नाही. यजमान असल्याने संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली गेली पाहिजे, यासाठी पाकिस्तानने अधिक चांगल्या वाटाघाटी करायला हव्या होत्या. पाकिस्तानला फक्त चार सामने मिळाले आणि श्रीलंकेत 9 सामने होणे हे आपल्या देशाच्या हिताचे नाही, असेही ते म्हणाले.

पुढे त्यांनी सारवासारव केली की, परंतु मला दिसत आहे की, हा निर्णय आधीच झाला आहे, म्हणून आम्हाला त्याबरोबर जावे लागेल. मी विरोध करणार नाही किंवा निर्णयाचे पालन न करण्याचा कोणताही हेतू नाही. मी त्याबद्दल फार काही करू शकत नाही; परंतु पीसीबीच्या वचनबद्धतेचा आदर करणे गरजेचे आहे, पण पुढे जाऊन आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय देशाच्या हितासाठी आणि हितासाठी घेतला जाईल.

हेही वाचा;

Back to top button