MPL 2023 : छत्रपती संभाजी किंग्जचा पराभव करून कोल्हापूर टस्कर्स संघ तिसर्‍या स्थानी | पुढारी

MPL 2023 : छत्रपती संभाजी किंग्जचा पराभव करून कोल्हापूर टस्कर्स संघ तिसर्‍या स्थानी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत फिरकीपटू श्रेयस चव्हाण (4-20) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा 8 गडी राखून पराभव करत तीन विजयांसह प्ले ऑफमधील आपले स्थान निश्चित केले. या विजयामुळे कोल्हापूर टस्कर्स संघाने 6 गुणांसह तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. (MPL 2023)

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून छत्रपती संभाजी किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. कोल्हापूरच्या आत्मन पोरेने संभाजी किंग्जच्या सौरभ नवलेला पहिल्याच चेंडूवर पायचित बाद केले. तर दुसर्‍या षटकात निहाल तुसमदने ओंकार खाटपेला झेलबाद करून संघाला दुसरा झटका दिला. मुर्तझा ट्रंकवालाने एका बाजूने लढताना 36 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. त्यानंतर ओम भोसलेच्या 22 धावा, आनंद ठेंगेच्या 18 वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. कोल्हापूरच्या श्रेयस चव्हाण (4-20), अक्षय दरेकर (2-12), सिद्धार्थ दरेकर (2-8) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा डाव 19.4 षटकांत 101 धावांवर संपुष्टात आला. (MPL 2023)

101 धावांचे आव्हान कोल्हापूर टस्कर्स संघाने सलामीवीर केदार जाधव (15 धावा) व अंकित बावणे (37 धावा) या जोडीने 32 धावांची भागीदारी केली. नौशाद शेखने 24 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या. त्यानंतर नौशाद शेख व साहिल औताडे (नाबाद 28 धावा) यांनी तिसर्‍या गड्यासाठी 23 चेंडूंत 29 धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला. सामन्याचा मानकरी श्रेयस चव्हाण ठरला.

हेही वाचा;

Back to top button