MPL 2023 : रत्नागिरी जेटस् ‘प्ले ऑफ’मध्ये | पुढारी

MPL 2023 : रत्नागिरी जेटस् ‘प्ले ऑफ’मध्ये

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सातव्या दिवशी धीरज फटांगरे (70 धावा), निखिल नाईक (41 धावा), प्रीतम पाटील (33 धावा) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीसह अझीम काझी (3-29) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेटस् संघाने ईगल नाशिक टायटन्स संघावर 12 धावांनी विजय मिळवला. (MPL 2023)

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी संघाचा अझीम 14 धावांवर खेळत असताना नाशिकच्या इझान सय्यदने त्याला झेलबाद केले. प्रशांत सोळंकीने त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यामुळे रत्नागिरी संघाने 3.3 षटकांत 33 धावा असताना आपला पहिला गडी गमावला. त्यानंतर धीरज फटांगरेने संयमी खेळी करत 51 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली. त्याला प्रीतम पाटीलने 19 चेंडूंत 5 षटकारांसह 33 धावा काढून साथ दिली. निखिल नाईक (41 धावा), दिव्यांग हिंगणेकर (नाबाद 17 धावा) आणि किरण चोरमले (नाबाद 18 धावा) च्या जोरावर रत्नागिरी संघाला 200 धावांचे आव्हान उभारून दिले. (MPL 2023)

201 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाला 20 षटकांत 5 बाद 188 धावाच करता आल्या. मंदार भंडारीने 39 चेंडूंत 8 चौकार व 4 षटकारांच्या साहाय्याने 74 धावांची झुंजार खेळी केली. मंदार व राहुल त्रिपाठी या जोडीने दुसर्‍या गड्यासाठी 47 चेंडूंत 78 धावांची भागीदारी केली. अझीम काझीने राहुलला 24 धावांवर तंबूत परत पाठवले. विजयासाठी नाशिकला 37 चेंडूंत 73 धावांची आवश्यकता होती. त्याचवेळी कौशल तांबेने 22 धावा तर धनराज शिंदेने नाबाद 43 धावा केल्या. शेवटच्या षटकात नाशिक संघाला 6 चेंडूत 27 धावांची आवश्यकता होती. धनराज शिंदेने नाबाद 43 धावांची लढत अपुरी ठरली व रत्नागिरी संघाने नाशिकला 188 धावांवर रोखून 12 धावांनी विजय मिळवला.

हेही वाचा;

Back to top button