युवासेना सिनेट निवडणुकीत सिंधुदुर्गातून जास्तीत जास्त मताधिक्य देणार | पुढारी

युवासेना सिनेट निवडणुकीत सिंधुदुर्गातून जास्तीत जास्त मताधिक्य देणार

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : मुंबई विद्यापीठ अंतर्गत आगामी होणार्‍या सिनेट निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार सिंधुदुर्ग जिल्हा युवासेनेने केला आहे. या निवडणुकीत 10 पैकी 10 सदस्य आमचेच विजयी होतील. सिंधुदुर्ग – रत्नागिरी मधून एक सिनेट मेंबर देण्यात यावा, अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे करणार आहोत. जेणेकरून या जिल्ह्यातील विद्यार्थी व युवकांचे प्रश्न त्वरित मार्गी लागतील.गावागावात मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी युवासेनेमार्फत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात युवासेना अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने लवकरच जिल्हाभर युवासेना पदाधिकारी दौरा करणार आहेत, अशी माहिती युवासेनेचे कोकण विभागीय सचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.

कुडाळ एमआयडीसी शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पक्ष संघटना वाढीसह अन्य विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर श्री.शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत घेत माहिती दिली. यावेळी जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, सागर नाणोसकर, योगेश नाईक, मदन राणे, ऑलवीन लोबो, अमित भोगले, स्वप्निल शिंदे, सागर भोगटे, संदीप म्हाडेश्वर, अमित राणे आदींसह जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

शिरसाट म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे शिवसेना पक्षाने युवासैनिकांना संधी दिली. या निवडणुकांमध्ये युवासेनेला चांगले यश मिळाले आहे. आगामी सर्वच निवडणुकांमध्ये पक्ष युवासैनिकांना निश्चितच संधी देईल. तसेच आगामी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातून एक सदस्य देण्यात यावा अशी मागणी पक्षाकडे करणार आहोत. या निवडणुकीत जिल्ह्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी युवासेना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

सन 2019 च्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत निवडून आलेले आ.निरंजन डावखरे आतापर्यंत पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच दिसले नाहीत. ते फक्त शासकीय कार्यक्रमांच्या पत्रिकेतच उपलब्ध असतात. जिल्ह्यात युवकांचे अनेक प्रश्न आहेत, परंतु त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षणमंत्र्यांचाही डीएड धारकांना कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप जिल्हाप्रमुख श्री.शिरसाट यांनी केला.

दहावी व बारावीचे निकाल अलिकडेच लागले आहेत. परंतु सध्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत. याची दखल युवासेनेने घेतली असून याबाबत आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली लवकरच जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार असल्याचे जिल्हाप्रमुख श्री.शिरसाट यांनी सांगितले.

Back to top button