Najam Sethi : नजम सेठी पीसीबी अध्यक्षपद सोडणार | पुढारी

Najam Sethi : नजम सेठी पीसीबी अध्यक्षपद सोडणार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आशिया चषक 2023 हा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवला जाणे हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा विजय की पराभव याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. दरम्यान, पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. नजम सेठी यांनी ट्विट करून आपण पीसीबी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पीसीबी अध्यक्षपदी का राहणार नाही आणि पुढची निवडणूक का लढवणार नाही, हेही त्यांनी यातून स्पष्ट केले. (Najam Sethi)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नजम सेठी यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम समिती स्थापन केली होती, ज्याचा कार्यकाळ 21 जून रोजी संपत आहे. पीसीबीच्या अध्यक्षपदी नजम सेठी कायम राहतील, असे यापूर्वी मानले जात होते; पण आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत ते नसल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केले. रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टस्नुसार, नजम सेठींच्या जागी झका अशरफ पीसीबीची जबाबदारी स्वीकारतील. झका अशरफ यांनी यापूर्वीही हे पद भूषवले आहे. मुंबई हल्ल्यानंतर 2012 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झाली होती. ती मालिका खेळवण्यात येण्यासाठी झका अशरफ यांचा मोठा वाटा होता. झाका अशरफ त्यावेळी पीसीबीचे अध्यक्ष होते.

काय म्हटले आहे ट्विटमध्ये

नजम सेठी यांनी ट्विट केले की, सर्वांना सलाम! मला पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आसिफ झरदारी यांच्यातील वादाचे कारण बनायचे नाही. ही अनिश्चितता आणि अस्थिरता पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी चांगली नाही. या सर्व परिस्थितीत मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही. सर्व संबंधितांना हार्दिक शुभेच्छा.

आशिया चषक आयोजनावरून नाचक्की

पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी मागील काही काळ आधीच कठीण गेले आहेत. आशिया चषकाचे यजमानपद पूर्णपणे हिसकावून घेण्याच्या भीतीने पाकिस्तानच्या बाजूने वेगवेगळी विधाने केली जात आहेत. प्रथम तो भारतात विश्वचषक खेळण्यास नकार देत होता, नंतर आशिया चषकासाठी हायब्रीड मॉडेल ऑफर केले. आता आशिया चषक हा हायब्रीड मॉडेलने खेळला जात आहे, वास्तविक आशिया चषकाचे फक्त 4 सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. यामुळे सेठी यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये असंतोष होता.

हेही वाचा;

Back to top button