R. Ashwin : माझ्या कुटुंबाने अनेक आघात सहन केले | पुढारी

R. Ashwin : माझ्या कुटुंबाने अनेक आघात सहन केले

चेन्नई; वृत्तसंस्था : रविचंद्रन अश्विन हा भारताचा कधीकाळी तीनही फॉरमॅटमधील अव्वल दर्जाचा गोलंदाज होता. मात्र वन-डे, टी-20 संघातील त्याचे स्थान डळमळीत होत गेले. आता रविचंद्रन अश्विन हा भारताचा कसोटीपटू म्हणूनच ओळखला जातो. तो सध्या ‘आयसीसी’च्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. मात्र, त्याला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळाले नाही. यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाली. माजी खेळाडूंनी देखील भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. यानंतर रविचंद्रन एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना असे अनेक आघात आपण आणि आपल्या कुटुंबाने सहन केल्याचे सांगितले. (R. Ashwin)

अश्विन याने आपल्यावर लावलेल्या अतिविचारी टॅगबद्दलही प्रतिक्रिया दिली. अश्विन म्हणाला की, ‘अनेक लोक मला अतिविचारी ठरवतात. ज्या व्यक्तीला सलग 15 ते 20 सामने खेळायला मिळतात तो अतिविचारी असण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीला फक्त त्याला 2 सामनेच खेळायला मिळणार आहेत याची कल्पना असते तो अतिविचारी होऊ शकतो.’ (R. Ashwin)

अश्विन म्हणाला की, ‘जर मला कोणी सांगितले की, तू 15 सामने खेळणार आहेस. तुझी आम्ही काळजी घेऊ, तुला नेतृत्व गटात स्थान मिळेल तर मी अतिविचारी होणार नाही. मी अतिविचारी का होऊ? एखाद्या व्यक्तीला त्याने केलेल्या प्रवासामुळे अतिविचारी म्हणणे हे न्याय नाही, असा कोणालाच अधिकार नाही.’

अश्विन पुढे म्हणाला की, ‘हा टॅग माझ्याविरुद्ध वापरण्यासाठी तयार करण्यात आलाय असे वाटत नाही का? मी म्हणतो की ज्यावेळी माझ्या बाबतीत नेतृत्व करण्याची चर्चा सुरू झाली, त्यावेळी लोकांनी अशी वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही लोक असे होते ज्यांनी बाहेर सांगण्यास सुरुवात केली की भारत परदेशी दौरा करते त्यावेळी यादीत माझे नाव पहिले नसते.’

‘यादीत माझे नाव पहिले आहे की नाही, ही गोष्ट माझ्या नियंत्रणात नाही. जर मी ते कमवले आहे तर ते तिथे असेलच, असा माझा विश्वास आहे. मी आधीही बोललो आहे की माझी कोणाविरुद्ध तक्रार नाही. मला मागे बसून टोमणे मारणे किंवा पश्चात्ताप करत बसण्यासाठी वेळ नाही.’

माझ्या वडिलांवर दुप्पट तणाव

अश्विनने त्याच्या कुटुंबावर देखील कसा आघात होतो हे देखील सांगितले. तो म्हणाला की, ‘माझ्या कुटुंबावर याचा किती आघात होतो हे मी पाहिले आहे. माझ्या वडिलांना हृदयविकार आणि इतर आरोग्याच्या तक्रारी आहेत.’ ‘प्रत्येक सामना, प्रत्येक दिवस काही ना काही घडत असते. ते मला कॉल करतात ते तणावात असतात. मी बाहेर असल्याने माझ्यासाठी गोष्टी सोप्या असतात. जाऊन खेळणे हे माझ्या नियंत्रणात असते. मात्र, माझ्या वडिलांसाठी तसे नाहीये. मी ज्या तणावातून जातोय त्याच्या दुप्पट तणावातून ते जात असतात. त्यामुळे बाहेरच्या सर्व गोष्टी संयुक्तिकच ठरत नाहीत.’

हेही वाचा; 

Back to top button