नवी दिल्ली; वृत्तसंस्था : फुटबॉल जगतातील सर्वोकृष्ट फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला भारतात खेळताना पाहण्याची संधी चालून आली होती. मात्र, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने आर्थिक कुवतीचे कारण पुढे करून अर्जेंटिनाचा हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यामुळे भारतातील लाखो मेस्सी प्रेमींची मोठी निराशा झाली आहे. (Lionel Messi)
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सचिव शाजी प्रभाकरन यांनी अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशनने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनशी याबाबत संपर्क केला होता. त्यांनी एका मैत्रीपूर्ण सामन्याचा प्रस्ताव देखील ठेवला होता. मात्र, आम्हाला हा प्रस्ताव नाकारावा लागला. कारण भारताकडे हा सामना आयोजित करण्यासाठी लागणारी आर्थिक ताकद नव्हती. यामुळे लाखो मेस्सी प्रेमींचा हिरमोड झाला आहे. त्यांच्या हातून मेस्सीला भारतात खेळताना पाहतानाची संधी निसटली. (Lionel Messi)
प्रभाकरन म्हणाले की, 'अर्जेंटिनाने आमच्याकडे मैत्रीपूर्ण सामना खेळण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, आम्हाला यासाठी लागणारी पैशाची ताकद उभा करणे शक्य नव्हते. अशा प्रकारचा सामना भारतात होण्यासाठी आम्हाला एका भक्कम पार्टनरची गरज होती. अर्जेंटिनाकडे मोठी आर्थिक ताकद आहे आमची आर्थिक स्थिती पाहता आम्हाला मर्यादा होत्या.'
ते पुढे म्हणाले की, 'गल्फ देशांची गोष्ट वेगळी. भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना म्हणजे मोठी तफावत झाली असती.' असे असले तरी प्रभाकरन हे अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशनसोबत आपले संबंध घट्ट करण्याबाबत आशावादी आहेत. ते म्हणाले की, 'आम्हाला अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशनसोबत भागीदारी करण्याची इच्छा आहे. अर्जेंटिना देखील यामध्ये चांगला रस दाखवत आहे. त्यांचे क्लब देखील यासाठी उत्सुक आहेत.'
मिळालेल्या माहितीनुसार अर्जेंटिनाने भारत आणि बांगलादेशमध्ये प्रत्येकी एक मैत्रीपूर्ण सामना खेळण्याची योजना आखली होती. मात्र, हे सामने होण्यासाठी लागणारा निधी या दोन्ही फुटबॉल संघटनांना जमवणे शक्य नव्हते. त्यामुळे अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलिया आणि चीनसोबत सराव सामना खेळला.
हेही वाचा;