Indonesia Open : सात्त्विक-चिराग सेमीफायनलमध्ये | पुढारी

Indonesia Open : सात्त्विक-चिराग सेमीफायनलमध्ये

जाकार्ता; वृत्तसंस्था : भारताच्या सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने शुक्रवारी येथे झालेल्या इंडोनेशिया ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या जोडीने उपांत्यपूर्व सामन्यात अव्वल मानांकित फजर अलफियान आणि मोहम्मद रियान अर्दियांतो यांना हरवले. भारताच्या या जोडीने इंडोनेशियन जोडीला 21-13, 21-13 असे सरळ गेममध्ये 41 मिनिटांत हरवले. तथापि, पुरुष एकेरीत भारताचा किदाम्बी श्रीकांत याचे आव्हान संपुष्टात आले. (Indonesia Open)

जागतिक स्पर्धेचा उपविजेता असलेल्या श्रीकांतला उपांत्य फेरी गाठता आली नाही. त्याला चीनच्या ली शी फेंग याने 14-21, 21-14, 12-21 असे हरवले. 69 मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व सामन्यात फेंगने विजय मिळवून गत पराभवाचा बदला घेतला. या दोघांमध्ये आतापर्यंत दोन सामने झाले असून दोघांनी एकेक विजय मिळवला आहे. (Indonesia Open)

श्रीकांतने सुरुवातीला 2-0 अशी आघाडी घेतली होती; परंतु त्याने सातत्याने केलेल्या चुकांची त्याला भरपाई करावी लागली. फेंगने पहिल्या गेममधील ब्रेकमध्ये 11-7 अशी आघाडी घेतली आणि गेमही जिंकला. दुसर्‍या गेममध्ये श्रीकांत पुन्हा आपल्या लयीत दिसला त्याने 11-6 अशी आघाडी मिळवून गेमवर 21-14 असे वर्चस्व मिळवले. तिसर्‍या गेममध्ये फेंगने सुरुवातीपासून अधिक्य मिळवले. या गेममध्ये फेेंगला दुखापतीचा त्रास होऊ लागला. ब्रेकमध्ये त्याने उपचार घेतले आणि डाव्या पायाला पट्टी बांधून कोर्टवर उतरला; परंतु त्याच्या खेळावर याचा काहीच परिणाम दिसत नव्हता. शेवटी त्याने 21-12 असा श्रीकांतचा गेम ओव्हर केला.

हेही वाचा;

Back to top button