Wimbledon 2023 : विम्बल्डनच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ | पुढारी

Wimbledon 2023 : विम्बल्डनच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ

लंडन; वृत्तसंस्था : यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेतील बक्षीस रकमेत गतवेळच्या तुलनेत 11.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एकूण बक्षीस रक्कम 4 कोटी 47 लाख पौंड (4 65 कोटी, 37 लाख 39 हजार भारतीय रुपयांत) इतकी असणार आहे. (Wimbledon 2023)

चार टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सर्वात प्रतिष्ठेची समजल्या जाणार्‍या या विम्बल्डन स्पर्धेतील विजेते (पुरुष आणि महिला) 23 लाख 50 हजार पौंड, तर उपविजेते प्रत्येकी 11.5 लाख 50 हजार पौंडचे मानकरी ठरतील. 2021 च्या तुलनेत ही वाढ फार मोठी आहे. (Wimbledon 2023)

कोरोनामुळे यावर्षी एकूण बक्षीस रकमेत 17 लाख पौंडची कपात करण्यात आली होती, मात्र गतवर्षी 20 लाख पौंडची वाढ करण्यात आली होती. पात्रता स्पर्धेसाठी असलेल्या बक्षीस रकमेत 14.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

मुख्य स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभूत होणारा खेळाडूही रिकाम्या हाताने परत जात नाही. त्याला मिळणार्‍या बक्षीस रकमेत 10 टक्के वाढ करण्यात आली असून त्याला कमीत कमी 55 हजार पौंड मिळतील. स्पर्धेत खेळणार्‍या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत वाढ करताना आम्हाला आनंद होत आहे, असे ऑल इंग्लंड लॉन टेनिस संघटनेचे कार्याध्यक्ष इयन हेविट यांनी सांगितले.

कोरोनापूर्वीच्या काळात आम्ही अशाच प्रकारे भरघोस बक्षीस रक्कम देत होतो. कोरोनामुळे त्याला ब्रेक लागला होता. आता पुन्हा आम्ही बक्षिसांचा वर्षाव खेळाडूंवर करणार आहोत, असेही हेविट म्हणाले. यंदाची विम्बल्डन स्पर्धा 3 ते 16 जुलैदरम्यान होत आहे.

हेही वाचा; 

Back to top button